महाराष्ट्रभर भीमज्योतीचा प्रवास, ३० एप्रिलला मुंबईत समारोप!

0

🔥महाराष्ट्रभर भीमज्योतीचा प्रवास, ३० एप्रिलला मुंबईत समारोप!

नागपूर (प्रतिनिधी-गजानन ढाकुलकर ) -/ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकता, जागरूकता आणि सामाजिक संदेश घेऊन निघालेली “भारताची भीमज्योत” आता आपल्या अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. विश्वजीत अनिलकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही भीमज्योत नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीतून प्रज्वलित होऊन अकोला, नाशिक, संभाजीनगर, लातूर, सोलापूर आणि पुणे असा व्यापक प्रवास करत ३० एप्रिल रोजी मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीत समर्पित होणार आहे.

यानंतर लोअर परळ येथील रवींद्र नाट्य मंदिरात भव्य सांगता समारंभ आयोजित करण्यात आला असून, राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत गायकवाड यांनी दिली.

या उपक्रमाचे आयोजन भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. नागपूरच्या दीक्षाभूमी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनुसूचित महिला मोर्चाच्या महामंत्री माधवीताई नाईक यांच्या उपस्थितीत भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर कविवर्य सुरेश भट सभागृहात विशेष चित्रफितीचे लोकार्पण करून या उपक्रमाची भव्य सुरुवात झाली.

यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये — अकोल्यातील स्पोर्ट्स क्लब, नाशिकचे रावसाहेब थोरात सभागृह, संभाजीनगरचे संत एकनाथ सभागृह, लातूरचे दयानंद सभागृह, सोलापूरचे हेरिटेज सभागृह आणि पुण्यातील गोलू आपटे सभागृह — येथे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पथनाट्य, सांस्कृतिक सादरीकरणे आणि इतिहासाशी जोडलेले संदर्भ मांडत समाजातील वास्तवावर प्रकाश टाकण्यात आला.

प्रत्येक शहरातील सभांमध्ये बोलताना विश्वजीत गायकवाड यांनी “भीमज्योत” या संकल्पनेचा उद्देश स्पष्ट केला. समाजात एकता, जागृती आणि सकारात्मक विचारांचा संदेश पोहोचवणे, तसेच विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या नकारात्मक नॅरेटिव्हला उत्तर देणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील समारोप सोहळ्यात राज्यभरातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार असून, हा कार्यक्रम सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नागपूरच्या दीक्षाभूमीपासून ते मुंबईच्या चैत्यभूमीपर्यंतचा हा प्रवास केवळ एक रॅली नसून, तो सामाजिक एकात्मतेचा आणि विचारप्रबोधनाचा संदेश देणारा एक व्यापक आंदोलन ठरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!