मुदत संपूनही ढाब्यावर बेकायदा कब्जा: बनावट परवान्यावर सुरू असलेल्या ‘न्यू बैठक ढाबा’ला अन्न व औषध प्रशासनाचे अभय?

0

🔥हेच ते हॉटेल,मुदत संपूनही ढाब्यावर बेकायदा कब्जा: बनावट परवान्यावर सुरू असलेल्या ‘न्यू बैठक ढाबा’ला अन्न व औषध प्रशासनाचे अभय?

🔥​परवाना रद्द तरीही ढाबा सुरूच! यवतमाळ FDA अधिकारी आणि कब्जाधारकांचे साटेलोटे? मालकाची वणी न्यायालयात दाद

​​यवतमाळ -/ मूळ मालकाचा अकरा महिन्यांचा भाडेकरार संपून तब्बल नऊ वर्षे उलटली तरीही ढाब्याचा बेकायदा ताबा न सोडता, मूळ मालकांच्या परस्पर बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘फूड लायसन्स’ मिळवून ढाबा चालवण्याचा धक्कादायक प्रकार वणी परिसरात उघडकीस आला आहे. न्यायालयाचा अवमान आणि बेकायदेशीर कारभाराविरोधात अन्न व औषध प्रशासन (FDA) यवतमाळ यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर सहाय्यक आयुक्तांनी संबंधित ढाब्याचा अन्न परवाना अधिकृतरीत्या रद्द केला. मात्र, परवाना रद्द होऊनही अन्न सुरक्षा अधिकारी सचिन नरवडे यांनी ढाब्यावर कोणतीही ठोस कारवाई वा सील न ठोकल्यामुळे, प्रशासनातील अधिकारी आणि कब्जाधारकांच्या संगनमतावर संशय व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या पत्नी हे सदर ढाब्याचे पूर्ण व अधिकृत मालक आहेत. त्यांनी २०१६-१७ दरम्यान युवराज धांडे आणि राजू माते यांना केवळ ११ महिन्यांच्या नोंदणीकृत भाडेकरारावर सदर ढाबा चालवण्यास दिला होता. २०१७ मध्ये या कराराची कायदेशीर मुदत संपुष्टात आली. मुदत संपल्यानंतर जागा रिकामी करून देण्याऐवजी, संबंधितांनी जागेवर बेकायदा कब्जा कायम ठेवला. ​आपली हक्काची मालमत्ता परत मिळवण्यासाठी मूळ मालकांनी वणी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात निष्कासन व ताबा प्राप्तीसाठी कायदेशीर दावा दाखल केला. न्यायालयात हे प्रकरण अंतिम पुराव्यांच्या टप्प्यावर असताना, संबंधितांनी न्यायालयाची पायमल्ली करत व्यवसाय सुरूच ठेवला. न्यायालयात खटला सुरू असताना, मूळ मालकांचे कोणतेही ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) किंवा संमती नसताना, कब्जाधारकांनी कथितरीत्या बनावट कागदपत्रे व प्रॉक्सी माहिती सादर करून अन्न व औषध प्रशासनाकडून ‘न्यू बैठक ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट’ या नावाने अन्न परवाना (Food License) मिळवला. मूळ मालकांच्या कायदेशीर अधिकारांना डावलून सुरू असलेल्या या गोरखधंद्याची तक्रार थेट अन्न व औषध प्रशासन, यवतमाळ यांच्याकडे करण्यात आली. ​तक्रारदारांनी न्यायालयामार्फत यवतमाळचे सहाय्यक आयुक्त चव्हाण यांना कायदेशीर नोटीस बजावली. प्रकरणाची गंभीरता आणि सादर केलेले पुरावे लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्तांनी संबंधित ढाब्याचा अन्न परवाना अधिकृतरीत्या रद्द करण्याचे आदेश दिले. नियमांनुसार कोणत्याही खाद्य आस्थापनेचा परवाना रद्द झाल्यानंतर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ती जागा तत्काळ सील करून अनधिकृत विक्री बंद करणे बंधनकारक असते. मात्र, परवाना रद्द करण्याचे लेखी आदेश असतानाही प्रत्यक्ष जागेवर ढाबा राजरोसपणे सुरूच आहे.
​स्थानिक अन्न सुरक्षा अधिकारी सचिन नरवडे हे कब्जाधारकांना पाठीशी घालत असून, संगनमत करून ढाबा सील करण्याच्या कारवाईकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप तक्रारदारांनी केला आहे. प्रशासकीय आदेशाला केराची टोपली दाखवून बेकायदा व्यवसायाला खुली सूट देण्यामागे नेमके कोणते अर्थकारण शिजत आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. मालकी हक्काची पायमल्ली, न्यायालयाचा अवमान आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची निष्क्रीयता यामुळे संतप्त झालेल्या मूळ मालकांनी आता वरिष्ठ पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची विभागीय चौकशी करून, अनधिकृतपणे सुरू असलेला ‘न्यू बैठक ढाबा’ तत्काळ सील करावा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!