यवतमाळ -/एकीकडे जिल्हा प्रशासनाकडून व्यसनमुक्तीचे दावे केले जात असताना, दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील फुलसांवगी हे गाव गांजा तस्करीचे मुख्य केंद्र (हब) म्हणून समोर आले आहे. पोलिसांच्या वारंवार होणाऱ्या कारवायांना न जुमानता तस्करीचे जाळे अधिकच घट्ट होत असून, यात अल्पवयीन मुलांचा बळी दिला जात असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलसांवगी ते थेट तेलंगणा
फुलसांवगी हे गाव केवळ स्थानिक पुरवठ्यापुरते मर्यादित राहिले नसून, येथून मोठ्या प्रमाणात गांजाची आंतरराज्य तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. तस्करांनी आपले जाळे ढाणकी, बीटरगाव, महागाव ते थेट माहूर आणि तेलंगणातील आदिलाबाद पर्यंत पसरवले आहे. पोलिसांनी आजवर अनेक तस्करांना जेरबंद केले असले, तरी या व्यवसायातील ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाटच असल्याने तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. या तस्करीचे सर्वात भयावह रूप म्हणजे यात अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग. तस्कर या मुलांना पैशांचे आमिष दाखवून किंवा व्यसनाची सवय लावून त्यांच्याकडून गांजाची ने-आण करण्याचे काम करून घेत आहेत. ही मुले पोलिसांच्या नजरेत लवकर येत नसल्याने तस्करांनी ही नवी शक्कल लढवली आहे. यामुळे शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. शासनाने दारूच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने व्यसनाधीन तरुणांनी आपला मोर्चा आता गांजाकडे वळवला आहे. दारूपेक्षा गांजा स्वस्त आणि सहज उपलब्ध होत असल्याने यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातील तरुण पिढी गांजाच्या झुरक्यात गुरफटली आहे. मागणी वाढल्याने या अवैध व्यवसायात अनेकांनी उडी घेतली असून, गल्लीबोळात गांजाची पाकिटे सहज उपलब्ध होत आहेत. गांजाच्या अतिसेवनामुळे तरुणांमध्ये मानसिक आजार, फुफ्फुसांचे विकार आणि इतर दुर्धर आजारांचे प्रमाण वाढले आहे. यवतमाळ जिल्ह्याची ओळख एकेकाळी शेतीसाठी होती, मात्र आता वाढत्या व्यसनाधीनतेमुळे हा जिल्हा ‘आजारी तरुणांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे.
संसदेत उमटले पडसाद पण प्रशासन सुस्त
यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात या गंभीर विषयावर आवाज उठवला होता. गुटखा, तंबाखू आणि प्रामुख्याने गांजा यांसारख्या अंमली पदार्थांवर कडक निर्बंध लादण्याची मागणी त्यांनी केली होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी इतक्या मोठ्या स्तरावर प्रश्न मांडूनही स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने याकडे डोळेझाक केल्याचे चित्र दिसत आहे. फुलसांवगीमध्ये गांजाचा मोठा साठा असल्याची शक्यता वारंवार वर्तवण्यात येत आहे. या साठ्यांवर तात्काळ छापे टाकून हा व्यवसाय मुळापासून उपटून टाकावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता, यामागच्या मोठ्या गुंडांना जेरबंद करण्याची गरज आहे. यवतमाळ जिल्ह्याला गांजाच्या या विळख्यातून वाचवण्यासाठी शासनाने केवळ घोषणा न करता ठोस कृती करण्याची वेळ आली आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर संपूर्ण तरुण पिढी या नशेच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.