🔥विनापरवाना ३५ रुग्णालयांना अभय; आरोग्यमंत्र्यांकडे थेट पुराव्यानिशी तक्रार दाखल
विशेष प्रतिनिधी,यवतमाळ-/ सर्वसामान्यांच्या आरोग्याची जीवनवाहिनी मानली जाणारी यवतमाळची शासकीय आरोग्य यंत्रणा सध्या भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांच्या मनमानी कारभारामुळे आणि त्यांच्या छत्रछायेखाली मिरवणाऱ्या अमोल जाधव या कथित ‘वसुलीबाज’ पंटरामुळे संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पार कोलमडून पडली आहे. गरिबांचे मरण स्वस्त करणाऱ्या या भ्रष्ट कारभाराची थेट राज्याच्या आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल झाली असून, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील वातावरण सध्या चांगलेच तापले आहे.
पुसद येथील ग्रामीण रुग्णालयातून नियमबाह्य पद्धतीने यवतमाळच्या जिल्हा कार्यालयात स्वतःची सोयीस्कर बदली (डेप्युटेशन) करून घेणाऱ्या अमोल जाधव याच्यावर औषध खरेदी-विक्रीचा कोणताही अधिकृत अनुभव नसताना मोक्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केवळ जिल्हा शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांचे खिसे भरणे आणि स्वतःची पोळी भाजून घेणे, एवढाच एककलमी कार्यक्रम सध्या या कार्यालयात सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. औषध खरेदीतील टक्केवारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि खासगी रुग्णालयांची मान्यता या सर्व व्यवहारांची चावी एकट्या अमोल जाधवाच्या हाती सोपवून राठोड यांनी स्वतःच्या एकाधिकारशाहीचा नंगानाच सुरू केला आहे.
यवतमाळ शहरामध्ये तब्बल ३५ हून अधिक खासगी रुग्णालये आरोग्य विभागाच्या कोणत्याही वैध परवान्याशिवाय सर्रास सुरू आहेत. अग्निशमन यंत्रणा, बॉयो-मेडिकल वेस्टची विल्हेवाट, प्रशिक्षित डॉक्टर व परिचारिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या अटींना धाब्यावर बसवून ही ‘दुकानदारी’ थाटली गेली आहे. या बेकायदेशीर रुग्णालयांवर कारवाई करण्याचे सोडून, अमोल जाधव यांच्याशी थेट ‘अर्थपूर्ण’ तडजोड करून त्यांना अभय दिले जात आहे. सर्व नियम धाब्यावर बसवून गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असताना राठोड आणि जाधव यांची वसुली टोळी मात्र गबर होत आहे.
जिल्ह्यातील नवजात बालके आणि गरोदर मातांच्या आरोग्यासाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या बाल रुग्णालये व प्रसूती रुग्णालयांची अवस्था अत्यंत भयावह झाली आहे. या ठिकाणी किमान वैद्यकीय सुविधांचा अभाव असताना, नियमांची पूर्तता न करणाऱ्या अशा संस्थांवर कायदेशीर चाप लावण्याऐवजी तिथे राठोड-जाधव जोडीचा थेट वरचष्मा पाहायला मिळत आहे. कमिशन देणाऱ्या संस्थांना संरक्षण आणि कायद्याचे पालन करणाऱ्या संस्थांना नाहक त्रास, अशी उघड खंडणीखोरी सुरू असल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कार्यालयातील वाढती एकाधिकारशाही आणि रुग्णांच्या जीवाशी चाललेला हा आर्थिक खेळ आता थेट आरोग्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचला आहे. पुसदवरून संशयास्पद डेप्युटेशनवर आलेल्या अमोल जाधवची तात्काळ मूळ जागी रवानगी करावी, राठोड यांच्या कार्यकाळातील औषध खरेदी आणि बेकायदेशीर परवान्यांची सखोल सीआयडी (CID) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला भ्रष्टाचाराचा अड्डा बनवणाऱ्या या टोळीवर राज्य शासन तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करणार की नेहमीप्रमाणे राजकीय वरदहस्ताखाली या प्रकरणावर पांघरूण घालणार, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)