यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील २४२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी ‘ईडी’चे छापे

0

🔥यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील २४२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी ‘ईडी’चे छापे

🔥​माजी मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानासह यवतमाळ व वणीतील सात ठिकाणी एकाच वेळी कारवाई; संचालक, मूल्यांकनकार आणि थकबाकीदारांचे धाबे दणाणले

​ प्रतिनिधी यवतमाळ-/ विदर्भातील नामांकित संस्थांपैकी एक असलेल्या येथील ‘बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड’मधील बहुचर्चित २४२ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जोरदार कारवाईचा बडगा उचलला. मुंबई आणि नागपूर येथील ‘ईडी’च्या पथकांनी यवतमाळ शहरासह वणी परिसरातील सात ते आठ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून तपास मोहीम सुरू केली. या धाडसत्रामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, अधिकारी, मालमत्ता मूल्यांकनकार (व्हॅल्यूअर) आणि बडे थकबाकीदार यांचे धाबे दणाणले आहेत. 

​मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी विविध पथकांच्या साहाय्याने ही छापेमारी सुरू केली. यामध्ये बाबाजी दाते महिला बँकेचे तत्कालीन मुख्याधिकारी अशोक कोन्चलवार यांच्या निवासस्थानावर धाड टाकण्यात आली. अधिकाऱ्यांनी घराचा ताबा घेत सकाळपासूनच महत्त्वाची आर्थिक कागदपत्रे, मालमत्तांची खरेदी-विक्री कागदपत्रे आणि बँकेच्या व्यवहारांशी संबंधित नोंदींची बारकाईने झाडाझडती सुरू केली. 

बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. संचालक मंडळ, बँक व्यवस्थापन आणि कर्जदारांच्या संगनमताने बँकेच्या नियमांना हरताळ फासत मनमानी पद्धतीने कर्जांचे वाटप करण्यात आले. एखाद्या मालमत्तेचे बाजारमूल्य अवघे १० लाख रुपये असताना मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याचे मूल्यांकन कृत्रिमरीत्या वाढवून त्यावर २० ते ३० लाख रुपयांचे अवाजवी कर्ज उचलण्यात आले. या बोगस आणि अपुऱ्या तारणावर वाटप करण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची कर्जे थकीत गेली. 

​एकूण २४२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामुळे बँकेची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आणि बँक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आली. परिणामी, बँकेतील तब्बल १७ हजार निष्पाप ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हक्काचे पैसे परत मिळवण्यासाठी ठेवीदार गेल्या चार-पाच वर्षांपासून सातत्याने लढा देत आहेत. बँकेची स्थिती डबघाईस आल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती केली होती. या आर्थिक अपहार प्रकरणी सहकार विभागाच्या लेखापरीक्षणात गंभीर अनियमितता समोर आल्यानंतर २०२२ मध्ये मोठी कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. बँकेचे तत्कालीन संचालक, व्यवस्थापकीय अधिकारी, ऑडिटर, व्हॅल्यूअर आणि २०६ प्रमुख थकबाकीदार अशा एकूण संबंधितांवर फसवणूक व अपहाराचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, महिनाभरापूर्वीच सहकार विभागाच्या वतीने बँकेच्या वसुली संदर्भात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली होती. त्यानंतर थकीत रकमेच्या वसुलीसाठी पावले उचलली जात असतानाच आता ‘ईडी’ने थेट मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (PMLA) सूत्रे हाती घेत कारवाई सुरू केली आहे. 

​गुरुवारी दिवसभर सुरू असलेल्या या कारवाईत ‘ईडी’च्या हाती आर्थिक गैरव्यवहार, बेनामी संपत्ती आणि संशयास्पद बँक खात्यांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे लागल्याचे समजते. या तपासातून येत्या काही दिवसांत बँकेच्या पैशांची विल्हेवाट लावणारे अनेक बडे चेहरे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!