यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेत १२ लाखांची ‘डील’; गुटखा तस्कर कुमार ओछाणीला फरार करण्यात ‘खाकी’चाच हात?

0

🔥हाच तो पोलीस निरिक्षक सतिष चवरे.🔥हाच तो गुटखा तस्कर कुमार ओछाणी

🔥यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेत १२ लाखांची ‘डील’;गुटखा तस्कर कुमार ओछाणीला फरार करण्यात ‘खाकी’चाच हात?

🔥​अमरावतीच्या मुख्य तस्कर जावेद सुपारीवालाशी संधान
विदर्भातील गुटखा नेटवर्कचा पर्दाफाश
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्तक्षेपाची मागणी

विशेष प्रतिनिधी,यवतमाळ -/ यवतमाळच्या पोलीस वर्तुळातून आणि गुन्हेगारी जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. प्रतिबंधित आणि आरोग्यासाठी घातक असलेल्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका कुख्यात तस्कराला वाचवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेतील एका वसुलीबाज कर्मचाऱ्याने तब्बल १२ लाख रुपयांची ‘डील’ केल्याची उघड चर्चा आता पोलीस दलात रंगू लागली आहे. गुटखा तस्कर कुमार ओछाणी याला अटक टाळण्यासाठी आणि त्याला न्यायालयातून सहज जामीन मिळवून देण्यासाठी ही प्राथमिक डिल झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या संपूर्ण प्रकरणात अमरावतीचा मुख्य गुटखा किंग जावेद सुपारीवाला आणि त्याचा यवतमाळातील हस्तक फिरोज यांची नावे समोर आल्याने, विदर्भातील गुटखा तस्करीचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे स्पष्ट झाले आहे.
​काही दिवसांपूर्वी गुटखा तस्कर कुमार ओछाणी याचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग करण्यात आला होता. गुन्हा वर्ग होताच कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी, एलसीबीमधील ‘किशोर’ नावाच्या एका कथित वसुलीबाज कर्मचाऱ्याने थेट तस्करांशी संधान साधले. आरोपी कुमार ओछाणीला अटक न करणे, तपासात ढिलाई दाखवणे आणि त्याला न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी पडद्यामागून मदत करणे, या अटींवर ही १२ लाख रुपयांची डिल फायनल झाली. या डिलनंतर यवतमाळातील कुख्यात गुटखा तस्कर कुमार ओछाणी याला सुरक्षितपणे फरार करण्यात स्थानिक गुन्हे शाखेतील काही घटकांनीच मदत केल्याचा गंभीर आरोप आता केला जात आहे. ​या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे शेजारच्या अमरावती जिल्ह्याशी जोडलेली आहेत. यवतमाळात ओछाणीवर कारवाई सुरू असताना, एलसीबीच्या संबंधित कर्मचाऱ्याने अमरावतीच्या मुख्य गुटखा तस्कर जावेद सुपारीवाला याच्याशी थेट संधान साधले. जावेद सुपारीवाला हा संपूर्ण विदर्भातील गुटखा तस्करीचा मुख्य सुसूत्रधार मानला जातो. यवतमाळात त्याचा बाजीराव, नजर, तसेच वेगवेगळ्या प्रकारचा सुगंधित तंबाखू तयार करण्याचा बेकायदेशीर कारखाना आणि नेटवर्क सुरू आहे. हा सुगंधित तंबाखू आणि गुटखा थेट मार्केटपर्यंत पोहोचवण्याचे काम कुमार ओछाणीसारखे एजंट करतात. या एजंटना पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी जावेदने यवतमाळात ‘फिरोज’ नावाचा एक खास हस्तक तैनात केला आहे.
​जावेद सुपारीवाला याचा विश्वासू हस्तक फिरोज हा आजही यवतमाळ आणि संपूर्ण विदर्भात सक्रिय आहे. फिरोजचे मुख्य काम म्हणजे बेकायदेशीर गुटखा वाहतुकीवर पाळत ठेवणे आणि पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पैशांच्या जोरावर ‘मुठीत’ ठेवणे. अधिकाऱ्यांना मॅनेज करणे, कोणाला किती हप्ता पोहोचवायचा, आणि कारवाई झाल्यास ती कशी दाबायची, याचे संपूर्ण मॅनेजमेंट फिरोजच्या माध्यमातून हाताळले जाते. यामुळेच विदर्भात दररोज लाखोंचा सुगंधित तंबाखू आणि गुटखा राजरोसपणे विकला जात आहे. ​अमरावतीचा मुख्य तस्कर जावेद सुपारीवाला याचे राज्यातील आणि स्थानिक पातळीवरील बड्या नेत्यांशी सुमधुर संबंध असल्याची चर्चा आहे. याच राजकीय वरदहस्ताचा वापर करून तो प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणतो. जर एखाद्या अधिकाऱ्याने त्याच्या गुटख्याच्या गाड्यांवर किंवा गोदामांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर थेट त्या अधिकाऱ्याची ‘उचलबांगडी’ (बदली) करण्याची धमकी दिली जाते. या राजकीय दबावामुळेच यवतमाळ आणि अमरावती पोलीस प्रशासनातील अनेक बडे अधिकारी कारवाई करण्याचे सोडून गुटखा तस्कर जावेद सुपारीवाला याची ‘बडदास्त’ राखताना आणि त्याला जी हुजूर करताना दिसत आहेत.​स्थानिक गुन्हे शाखेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विभागातील कर्मचाऱ्याने १२ लाखांची डिल करून आरोपीला फरार होण्यास मदत केल्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. स्थानिक पातळीवर पोलीस आणि तस्करांचे साटलोटं इतकं घट्ट झालं आहे की, आता स्थानिक पोलीस यावर कोणतीही निष्पक्ष कारवाई करू शकत नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी स्वतः या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.   ————————=—————-

पोलीस दलातील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याची मागणी
​एलसीबीचा कर्मचारी ‘किशोर’ आणि तस्कर यांच्यात झालेल्या १२ लाखांच्या डिलची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
​गुन्हा वर्ग झाल्यानंतर आरोपी कुमार ओछाणी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार कसा झाला? त्याला कोणी मदत केली?
​अमरावतीचा मुख्य तस्कर जावेद सुपारीवाला आणि त्याचा यवतमाळातील हस्तक फिरोज यांच्या कॉल डिटेल्स (CDR) ची चौकशी करून त्यांचे पोलीस अधिकाऱ्यांशी असलेले संबंध उघड करावेत.
​या कारवाईकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक या ‘खाकी’तील वसुलीबाजांवर आणि गुटखा किंगवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!