यवतमाळच्या ‘गुटखा किंग’ला स्थानिक गुन्हे शाखेचेच अभय? ‘मोक्का’च्या प्रस्तावानंतरही कुमार ओछाणी मोकाट; एलसीबीचे संशयास्पद मौन!

0

🔥हेच ते यवतमाळ चे स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख सतिष चवरे.🔥हाच तो कुख्यात गुटखा तस्कर कुमार ओछाणी

🔥यवतमाळच्या ‘गुटखा किंग’ला स्थानिक गुन्हे शाखेचेच अभय? ‘मोक्का’च्या प्रस्तावानंतरही कुमार ओछाणी मोकाट; एलसीबीचे संशयास्पद मौन!

🔥​अमरावती कनेक्शन लपवण्यासाठी कोट्यवधींची ‘डील’? एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह;

🔥पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेकडे विदर्भाचे लक्ष.

(​विशेष प्रतिनिधी)यवतमाळ-/ विदर्भातील गुटखा तस्करीचे मुख्य केंद्र बनलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून एक खळबळजनक आणि पोलीस प्रशासनाला पुरती काळिमा फासणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे. यवतमाळचा कुप्रसिद्ध गुटखा तस्कर कुमार ओछाणी याच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अन्न व औषध प्रशासनाने दिल्यानंतर, पोलीस विभागाने तस्करांना पकडण्याऐवजी चक्क ‘अभय’ दिल्याचे चित्र आहे. यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातून हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग होताच, तपासाची चक्रे फिरण्याऐवजी संपूर्ण यंत्रणाच ठप्प झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी आरोपीला अटक करण्यासाठी आपली पथकेच कार्यान्वित न केल्याने, पोलिसांच्या खाकी वर्दीमागील ‘आर्थिक मलिदा’ आता चव्हाट्यावर आला आहे. कुमार ओछाणी गजाआड गेल्यास विदर्भातील गुटखा तस्करीचे आंतरजिल्हा रॅकेट उघडकीस येईल, याच भीतीने एलसीबीच्या बड्या अधिकाऱ्यांवर कोट्यवधींचा आर्थिक दबाव आणि प्रलोभने टाकून ओछाणीला खुली सूट देण्यात आल्याची धक्कादायक चर्चा पोलीस वर्तुळातच रंगली आहे. ​काही दिवसांपूर्वी यवतमाळ पोलिसांनी कुमार ओछाणी याच्या घरावर धाड टाकून लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला होता. ही कारवाई झाल्यानंतर यवतमाळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, ओछाणी याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यश मिळवले. पोलीस कोठडीत जाण्यापूर्वीच आरोपी पसार होणे, हीच मुळात संशयास्पद बाब होती. गुटखा बंदी असतानाही यवतमाळसह संपूर्ण विदर्भात विषारी गुटख्याचे जाळे विणणाऱ्या या तस्कराविरुद्ध एफडीएने अत्यंत कठोर पाऊल उचलत त्याच्यावर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लावण्याचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाकडे पाठवला. ​गुन्ह्याचे गांभीर्य आणि आंतरजिल्हा कनेक्शन पाहता हा गुन्हा शहर पोलीस स्टेशनमधून काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. एलसीबी गुन्हेगारा मुसक्या आवळेल अशी अपेक्षा असताना, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी तपासाची दिशाच बदलून टाकल्याचा आरोप होत आहे. आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करणे गरजेचे असताना, एलसीबीने जाणीवपूर्वक सुस्त भूमिका घेतली. हे मौन ओछाणीला पळून जाण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दिलेली ‘सुपारी’ तर नाही ना? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.

​यवतमाळ हा केवळ विक्रीचा साठा होता, मात्र या काळ्या धंद्याची मुख्य पाळेमुळे अमरावतीत रुजलेली आहेत. कुमार ओछाणी हा स्वतः किंग नसून, तो अमरावती येथील गुटख्याचा मुख्य माफिया ‘जावेद सुपारीवाला’ आणि त्याचा म्होरक्या ‘अमित कल्याण’ यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गुटखा आयात करत होता. अमरावतीचा जावेद सुपारीवाला हा संपूर्ण विदर्भातील गुटखा तस्करीचा खरा ‘डॉन’ (किंग) मानला जातो. जावेद आणि अमित कल्याण यांच्याकडून कंटेनरच्या कंटेनर यवतमाळात यायचे आणि कुमार ओछाणी तेथून ते विदर्भाच्या कानाकोपऱ्यात सप्लाय करायचा.

​जर स्थानिक गुन्हे शाखेने कुमार ओछाणीला अटक करून खाकीचा खाक्या दाखवला असता, तर अमरावतीचा जावेद सुपारीवाला आणि अमित कल्याण यांच्यापर्यंत पोलिसांचे हात पोहोचले असते. विदर्भातील या मोठ्या रॅकेटमध्ये अनेक पांढरपेशा राजकारणी, बडे व्यापारी आणि पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकारी अडकल्याची दाट शक्यता आहे. हेच मोठे मासे वाचवण्यासाठी एलसीबीने ओछाणीला अटक न करण्याचा ‘विडा’ उचलल्याचे दिसत आहे. ​अत्यंत विश्वासू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार ओछाणी याच्यावर मोक्का लागणार हे स्पष्ट झाल्यानंतर गुटखा लॉबीमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. जर मोक्का लागला तर कोट्यवधींची संपत्ती जप्त होईल आणि वर्षानुवर्षे जामीन मिळणार नाही, हे माहीत असल्याने कुमार ओछाणीने स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट ‘अर्थपूर्ण’ संधान साधल्याची चर्चा आहे. एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके का पाठवली नाहीत? अमरावतीच्या जावेद सुपारीवालाच्या नावाचा उल्लेख डायरीत असतानाही अमरावतीत धाडी का टाकण्यात आल्या नाहीत? गुटखा माफियांचा आर्थिक दबाव एवढा मोठा आहे का, की ज्यामुळे कायद्याचे रक्षकच गुन्हेगारांचे ढाल बनले आहेत? या सर्व प्रश्नांमुळे यवतमाळ एलसीबीची प्रतिमा पूर्णपणे मलिन झाली आहे. ​विदर्भात गुटख्यामुळे दररोज हजारो तरुण कर्करोगाच्या (कॅन्सर) विळख्यात अडकत आहेत. अशा परिस्थितीत कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या तस्करांना पोलीसच पाठीशी घालत असतील, तर जनतेने न्याय कोणाकडे मागावा? गृहविभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. यवतमाळ एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांची निष्क्रियता की संशयास्पद सक्रियता? याची चौकशी होऊन, कुमार ओछाणी आणि अमरावतीच्या जावेद सुपारीवाला टोळीला तात्काळ बेड्या ठोकण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.(क्रमशः)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!