🔥पीरबाबा देवस्थानाकडे जाणारा निकृष्ट दर्जाचा रस्ता; दोषी कंत्राटदार व अभियंत्यावर कठोर कारवाई करा – खासदार अमर काळे यांची मागणी.
वर्धा/कारंजा -/ कारंजा नगरपरिषद क्षेत्रातील पीरबाबा देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित कंत्राटदार व तांत्रिक अभियंत्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कामाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदाराचे कोणतेही देयक अदा करू नये, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना पत्राद्वारे केली आहे.
पत्रात खासदार अमर काळे यांनी नमूद केले आहे की, नागरिकांकडून कराच्या स्वरूपात जमा होणाऱ्या निधीतून कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली जातात. या निधीचा उपयोग नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी होणे अपेक्षित असताना काही ठेकेदार व संबंधित अधिकारी संगनमताने निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाच्या निधीचा अपव्यय करत आहेत. कमी खर्चात दर्जाहीन काम करून जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांचा विश्वास डळमळीत होत आहे.
कारंजा शहरातील पीरबाबा देवस्थानाकडे जाणारा रस्ता बांधून अवघे दोन महिने होत असतानाच पहिल्याच पावसात अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला असून मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदार व संबंधित तांत्रिक अभियंत्यावर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार अमर काळे यांनी केली आहे.
तसेच चौकशी पूर्ण होऊन रस्त्याची आवश्यक दुरुस्ती व दर्जानुसार पुनर्बांधणी होईपर्यंत संबंधित कंत्राटदारास कोणतेही भुगतान करण्यात येऊ नये, असेही त्यांनी प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांना दिलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
निकृष्ट दर्जाच्या विकासकामांमुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शासनाने दोषींविरुद्ध कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचेही खासदार अमर काळे यांनी आपल्या पत्रात अधोरेखित केले आहे.