🔥राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धेत नागपूर व नाशिक विभागांचा झेंडा;सेलूची क्रीडा नकाशावर पुन्हा एकदा छाप.!सेलू -/जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्धा, वर्धा जिल्हा लंगडी असोसिएशन, सूर्यधरम स्पोर्टिंग क्लब सेलू व स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय लंगडी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेमुळे सेलू शहराने पुन्हा एकदा राज्याच्या क्रीडा नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धेत मुलींच्या गटात नागपूर विभाग संघाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. संभाजीनगर विभाग संघाने द्वितीय, मुंबई विभाग संघाने तृतीय, तर नाशिक विभाग संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. मुलांच्या गटात नाशिक विभाग संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुंबई विभाग संघ उपविजेता ठरला, तर कोल्हापूर विभाग संघाने तृतीय व लातूर विभाग संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला.
नागपूर विभागातील मुलींच्या संघाने परत एकदा दुसऱ्यांदा विजेतेपदावर आपले नावं कोरले आहे. मागीलवर्षी उदगीर येथे झालेल्या स्पर्धेत देखील नागपूर विभागातील संघाने बाजी मारली होती. सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालयाचा मुलींचा लंगडीचा संघ हा नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करीत होता. त्यांनी घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर आम्हीच शेरास-सव्वाशेर असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या संघातील “सुहानी नेहारे” हिने तर कमालचं केली आणि शतक गाठले.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्याला विधान परिषदेचे आमदार दादाराव केचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे (वंजारी), ज्येष्ठ नागरिक सुरेशबाबू जयस्वाल, महाराष्ट्र लंगडी असोसिएशनचे सचिव चेतन पागावाड, वर्धा जिल्हा लंगडी असोसिएशनचे अध्यक्ष निशिकांत मेघे, सेलू शिक्षण मंडळाचे नविनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी, सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष ॲड. रामप्रसाद लिल्हारे, उपमुख्याध्यापिका डॉ. कल्पना मकरंदे, जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव अनंत भाकरे, क्रीडाशिक्षक व स्पर्धा संयोजक सागर राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, पुणे व मुंबई या सात प्रमुख विभागांतील संघांनी सहभाग नोंदवला. मैदानावर खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला, तर उत्कंठावर्धक सामने पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.
विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, शिस्त व खिलाडूवृत्ती रुजवणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे संयोजक सागर राऊत यांनी यावेळी सांगितले. ही स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, तालुका क्रीडा अधिकारी संदीप खोब्रागडे, जिल्हा लंगडी असोसिएशनचे सचिव अनंत भाकरे व सूर्यधरम स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष ॲड. रामप्रसाद लिल्हारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मिथुन हांडे व शिक्षिका जयश्री चव्हाण यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी लंगडी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.