🔥सेलू तालुका स्तरीय भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव थाटात संपन्न.
सेलू-/ येथे दिनांक २ व ३ जानेवारी दरम्यान सेलू तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशवंत हायस्कूल सेलू च्या प्रांगणात थाटात व मोठ्या उत्साहात साजरा झाला.
… दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा,शाळेच्या चार भिंतीच्या बाहेर पडून तालुका स्तरावर आपले मैदानी वैयक्तिक व सांघिक तसेच सांस्कृतिक खेळातील आपल्या नैपुण्याचे प्रदर्शन करून मानाच्या सन्मानचिन्हावर आपले नाव कोरावे, मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र स्वीकारून अविस्मरणीय क्षणांचा आनंद लुटावा आणि स्वतः सोबतच शाळा, आपले प्रशिक्षक व आई-बाबांचे नाव मोठे करावे तसेच या मधूनच पुढे देशासाठी महान खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून …दरवर्षी पंचायत समिती तर्फे शिक्षण विभागाच्या माध्यमातून प्रथम केन्द्र- स्तरीय, त्यानंतर बीट स्तरीय व त्यानंतर तालूका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तालूका स्तरावर विजयी विद्यार्थी दिनांक १६ ते १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य पणाला लावून बक्षिसे जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी खेळाडू व संघासोबत लढत देतील.
… सेलू तालुका स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव मध्ये सेलू तालूक्यातील जिल्हा परिषद च्या १०५ शाळांतील ७४२ विद्यार्थी सहभागी झाले होते. सोबतच त्यांचे चमुप्रमुख, मुख्याध्यापक, व सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यासाठी दोनवेळा सभांचे आयोजन करून प्रशासकीय,निर्णय, क्रीडा,स्वागत,भोजन व ईतर अशा ११ समित्यांचे गठन करून अतिशय नियोजन बध्द पध्दतीने कार्यक्रम पार पाडण्यात आला. निमंत्रित मान्यवर काही पाहुण्यांचे काही तांत्रिक कारणांमुळे येणे शक्य झाले नाही, परंतु मा. दादारावजी केचे, सदस्य विधान परिषद यांनी मात्र कार्यक्रम स्थळी भेट देऊन बाल खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. देवानंद पाणबुडे गटविकास अधिकारी हे, तर अध्यक्ष मा. रामचंद्र चोपडे हे होते.प्रमुख मार्गदर्शक श्रीमती संगीता महाकाळकर गटशिक्षणाधिकारी,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती अर्चना पुरेड्डीवार ,सौ.शालिनी हाते,नितीन फासगे मुख्याध्यापक य यशवंत हायस्कूल सेलू, मा. डॉ. संदीप काळे, प्राचार्य यशवंत महाविद्यालय सेलू, सर्व केन्द्र- प्रमुख, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षक, चमु प्रमुख, मुख्याध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व सहकारी उपस्थित होते.
सर्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. चार बीट मधून सर्वात जास्त गुण सेलू बीट ला मिळाल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी सेलू बीट ला मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा सचिव तथा शिक्षण विस्तार अधिकारी संजय वाढवे यांनी केले. तर सुत्र संचालक मोहन सायंकाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक संघटना, शिक्षक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय भव्य-दिव्य करण्यात आल्यामुळे शिक्षण विभाग, पंचायत समिती सेलू चे सर्वत्र कौतुक होत आहे.