सेवाग्राम विकास आराखडा शिखर समितीची बैठक सेवाग्राम विकास आराखड्यास अतिरिक्त ८१ कोटींचा निधी मंजूर

0

By साहसिक न्युज 24
प्रतिनिधी / वर्धा:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१.५७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला तसेच एकूण २४४.०८७ कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मान्यता देण्यात आली. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाची कामे ही वेळेत पूर्ण व्हावीत तसेच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पालकमंत्री सुनील केदार, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री रणजित कांबळे, पंकज भोयर यांच्यासह मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर आदी उपस्थित होते.
सेवाग्राम प्रकल्प संवर्धनासाठी दरवर्षी दहा कोटींचा अतिरिक्त निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या सुत्रानुसार देय ठरणा-या नियतव्ययाच्या व्यतिरिक्त आणखी रुपये १० कोटी इतका अतिरिक्त निधी दरवर्षी जिल्हा नियोजन समिती, वर्धा यांना सेवाग्राम विकास आराखडयाअंतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या संवर्धनासाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती- नवीन उपक्रमाची अंमलबजावणी आज झालेल्या बैठकीत “राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती” हा नवीन उपक्रम राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली. आज मंजूर करण्यात आलेल्या ८१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमध्ये या नवीन उपक्रमासाठी ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये विविध नावीन्यपूर्ण कामांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमामध्ये ग्रंथालय आणि रिसोर्स सेंटर, गांधी विचार आणि प्रतिमा: हेरिटेज ट्रेलचा विस्तार, अभ्यागत केंद्राच्या ठिकाणी इंटरॲक्टीव्ह प्रदर्शन- ३ डी इमेजिंग, मल्टी मिडिया तंत्रज्ञानाचा वापर करून गांधीजींचे अर्थव्यवस्था, धर्म, जाती, लिंग यासंबंधीचे विचार तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या रेल्वे कोचच्या आसपास दक्षिण अफ्रिकेतील निवासाबाबत कलाकृती, प्रदर्शन आणि नवीन लँडस्केपचे निर्माण केले जाणार आहे. सेवाग्राम आश्रम परिसरातील हेरीटेज पोस्ट ऑफीसचा वारसा जतन करून तिथे तिकीट संग्रहालय प्रदर्शनीचे आयोजित करण्यात येईल. याशिवाय या परिसरातील तलाव, बागांच्या विकासाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!