उमरखेडमध्ये गॅरेजमध्ये ट्रॅक्टरचे वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी

0

🔥उमरखेडमध्ये गॅरेजमध्ये ट्रॅक्टरचे वेल्डिंग करताना भीषण स्फोट; दोघांचा जागीच मृत्यू, पाच गंभीर जखमी

🔥​बैलबाजार परिसरातील घटना; विहिरीच्या ब्लास्टिंग यंत्रणेतील स्फोटकांमुळे दुर्घटना घडल्याचा संशय, संपूर्ण परिसर हादरला

​यवतमाळ -/ यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात आज (२६ सप्टेंबर) दुपारी घडलेल्या एका भीषण स्फोटात दोन जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील गजबजलेल्या बैलबाजार मैदानासमोरील एका गॅरेजमध्ये विहिरीच्या ब्लास्टिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरचे वेल्डिंग काम सुरू असताना ही दुर्दैवी दुर्घटना घडली. स्फोट इतका तीव्र होता की त्याचा आवाज कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.

​मिळालेल्या माहितीनुसार, बैलबाजार परिसरातील एका वर्कशॉपमध्ये विहिरींच्या कामासाठी ब्लास्टिंग युनिट बसवलेल्या ट्रॅक्टरच्या दुरुस्ती व वेल्डिंगचे काम सुरू होते. वेल्डिंग चालू असतानाच अचानक गॅस सिलेंडर अथवा ट्रॅक्टरमधील स्फोटक घटकांचा मोठा भडका उडून कानठळ्या बसवणारा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की कामाच्या ठिकाणी उभ्या असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना सावरण्याची किंवा सुरक्षित स्थळी पळण्याची संधीही मिळाली नाही.

​घटनेनंतर स्थानिक नागरिक व व्यावसायिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. स्फोटात गॅरेजमधील व परिसरातील इतर पाच जण गंभीर भाजले असून त्यांना त्वरित उमरखेड येथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील काहींची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने प्रथमोपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​घटनेचे वृत्त समजताच उमरखेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत.

​लोकवस्ती आणि बाजारपेठ असलेल्या भागात अशा प्रकारे विहिरीच्या ब्लास्टिंगची स्फोटके किंवा उपकरणे निष्काळजीपणे हाताळली जात होती का, तसेच वेल्डिंग करताना आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते की नाही, या दिशेने पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली आहे. या धक्कादायक दुर्घटनेमुळे उमरखेड शहर व यवतमाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!