सेलूच्या कापूस यार्डचा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात!

0

🔥सेलूच्या कापूस यार्डचा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात!🔥मुरमुरा फॅक्टरीला बाजार समितीची थेट नोटीस; ‘तात्काळ रस्ता मोकळा करा’, अन्यथा अतिक्रमण हटवून खर्च वसूल करण्याचा इशारा

सेलू -/ शेतकऱ्यांच्या कापूस वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला उपबाजारपेठ सेलू येथील कापूस यार्डकडे जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. वाढत्या शेतकरी व वाहनांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना, रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती, सिंदीने संबंधित मुरमुरा फॅक्टरीला थेट नोटीस बजावली आहे.

बाजार समितीचे सचिव तथा मुख्याधिकारी यांनी मुरमुरा फॅक्टरीचे मालक श्रीनिवास वेदमानपुडी यांना दिलेल्या नोटीसमध्ये रस्त्यावरील सर्व अतिक्रमण तात्काळ व स्वतःहून हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

बाजार समितीच्या पत्रानुसार, सेलू येथील नवीन कापूस यार्डकडे जाण्यासाठी सुकळी रोडवरून पूर्व-पश्चिम असा हा रस्ता उपलब्ध आहे. पूर्वी या रस्त्याचा बाजार समितीमार्फत नियमित वापर होत नसल्याने सुरक्षेच्या कारणास्तव येथे वॉल कंपाउंड करण्यात आले होते. मात्र, सध्या बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून कापूस घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्याही प्रचंड वाढणार आहे.

यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. ही अडचण दूर करण्यासाठी बाजार समितीने पूर्व-पश्चिम रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याचा निर्णय घेतला.

🔥‘वॉल कंपाउंडचा गैरफायदा घेतला’—बाजार समितीचा गंभीर आक्षेप.!

याच दरम्यान, रस्त्यावर असलेल्या वॉल कंपाउंडचा गैरफायदा घेऊन मुरमुरा फॅक्टरीकडून रस्त्याच्या जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करण्यात आल्याचे निदर्शनास आले असल्याचे बाजार समितीने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.या अतिक्रमणामुळे बाजार समितीत ये-जा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत असून, कापूस वाहनांची वाढणारी गर्दी आणि त्यात रस्त्यावरील अडथळा यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.

🔥‘स्वतःहून हटवा, नाहीतर समिती हटवेल.!’

बाजार समितीने संबंधितांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, पत्र मिळताच रस्त्यावरील सर्व अतिक्रमण तात्काळ व स्वतःहून हटवून रस्ता मोकळा करून द्यावा.विहित मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास बाजार समिती प्रशासनामार्फत हे अतिक्रमण हटविण्यात येईल आणि अतिक्रमण हटविण्यासाठी झालेला संपूर्ण खर्च तसेच पुढील कायदेशीर कारवाईची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

🔥शेतकऱ्यांच्या रस्त्यावर अतिक्रमण किती दिवस?

कापूस हंगामात शेतकऱ्यांची वाहने मोठ्या संख्येने बाजार समितीत दाखल होत असताना वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ताच अडवला जात असेल, तर शेतकऱ्यांना कोंडीत अडकवण्याची वेळ का यावी, असा प्रश्न या कारवाईमुळे उपस्थित झाला आहे. बाजार समितीने आता थेट नोटीस बजावल्याने या अतिक्रमणावर प्रत्यक्ष कारवाई कधी होते, याकडे शेतकरी आणि व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

🔥नोटीस कागदावरच राहणार की रस्ता प्रत्यक्षात मोकळा होणार?

हा आता सेलूतील शेतकरी आणि नागरिकांसमोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे.(क्रमशः…)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News -/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!