🔥थ्री-स्टार मानांकन फक्त कागदावरच;सेलू नगरपंचायतीचा “झीरो स्टार”कारभार उघड.🔥दूषित पाणीपुरवठा,स्वच्छतेचा बोजवारा; लाखोंचा खर्च व्यर्थ.
सेलू -/थ्री-स्टार मानांकन प्राप्त नगरपंचायतीचा प्रत्यक्ष कारभार मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारा ठरत आहे. नगराची स्वच्छता आणि शुद्ध पाणीपुरवठा करण्यात नगरपंचायत सपशेल अपयशी ठरली असून गेल्या कित्येक दिवसांपासून शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करूनही शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ‘थ्री-स्टार’ मानांकन फक्त कागदापुरतेच मर्यादित राहिले का? असा संतप्त सवाल आता शहरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.
शहरातील अनेक भागांत नळाला येणारे पाणी गढूळ आणि मळकट असून पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. पाण्यात गाळ, दुर्गंधी आढळत असल्याने नागरिकांना पाणी उकळून अथवा फिल्टर करून वापरण्याची वेळ आली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाही नगरपंचायत प्रशासन मात्र गांभीर्याने दखल घेत नसल्याचे चित्र आहे.
शहरातील स्वच्छतेबाबतही परिस्थिती तितकीच विदारक आहे. घनकचरा व्यवस्थापनावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर, मोकळ्या जागांमध्ये आणि नदीकाठावर कचऱ्याचे ढिग साचले आहेत. घनकचरा संकलनाचे काम एकलव्य ट्रेडिंग कंपनीकडे देण्यात आले असले तरी कचऱ्याचे योग्य संकलन व विल्हेवाट होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
शहरातील स्मशानभूमी परिसरातच मोठ्या प्रमाणावर कचरा साठवला जात असून यामुळे प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांसह अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. नाकाला रुमाल बांधूनच या परिसरातून वावर करावा लागत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
लाखोंचा खर्च करून उभारण्यात आलेला कचरा डेपो शहराबाहेर असतांनाही तो केवळ ‘शोभेची बाहुली’ ठरला आहे. दुसरीकडे बोर नदीच्या तिरावर खुलेआम कचरा टाकला जात असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असून नदी प्रदूषणाचा धोका वाढला आहे.
थ्री-स्टार मानांकन मिळवताना सादर करण्यात आलेल्या अहवालांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नगरपंचायतीला प्रत्यक्षात मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयश का येते, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. दूषित पाणीपुरवठा व ढिसाळ स्वच्छता व्यवस्थेमुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांची जबाबदारी नेमकी कोण घेणार, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.