यवतमाळ -/ बांधकाम कामगारांच्या नावे सुरू असलेला कोट्यवधींचा बोगस नोंदणी घोटाळा उघडकीस आणल्याच्या आकसामधून बाभुळगाव तालुक्यातील कृष्णापूर येथे एका बौद्ध समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यावर ५० हून अधिक जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या पूर्वनियोजित हल्ल्याचा मुख्य सूत्रधार भाजपचा जिल्हा सचिव सतीश मानलवार असल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. लाचखोरीच्या प्रकरणात आधीच विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या बाभुळगाव पोलिसांनी या प्राणघातक हल्ल्याची साधी नोंदही न घेता आरोपींना पाठीशी घातल्याने संताप व्यक्त होत आहे. दहशतीमुळे पीडित कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, अखेर न्यायासाठी विशेष ॲट्रॉसिटी न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. जिल्ह्यात कामगार कल्याण मंडळातील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवावर बेतल्याचा खळबळजनक प्रकार बाभुळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णापूर (कोटबा) येथे समोर आला आहे. जनवादी बांधकाम कामगार मजदूर संघटना व विश्व विजेता पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रत्नपाल गोवर्धन डोफे यांनी परिसरातील बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस आणले होते. या घोटाळ्याचा अधिकृत अहवाल जिल्हा सरकारी कामगार अधिकाऱ्यांमार्फत अमरावती उपआयुक्तांकडे कारवाईसाठी पाठवण्यात आला होता. या कारवाईचा व आर्थिक नुकसान झाल्याचा राग मनात धरून भाजपचे जिल्हा सचिव तथा राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी सतीश मानलवार व त्यांच्या समर्थक टोळीने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.
यापूर्वी पीडित कुटुंबातील मुलीचा विनयभंग करून पोलीस ठाण्यातच जीवे मारण्याची धमकी आरोपींच्या समर्थकांनी दिली होती. त्यावेळी बाभुळगावच्या ठाणेदार दिपमाला भेंडे यांनी आरोपींकडून आर्थिक हितसंबंध जोपासत प्रकरण दाबून टाकले, असा आरोप डोफे यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, पीडितालाच उलट खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ठाण्यात तासनतास बेकायदेशीर डांबून ठेवण्यात आले होते. या पोलीस अत्याचाराविरोधात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, अमरावती येथे दाद मागितल्यानंतर प्राधिकरणाने २३ सप्टेंबर २०२६ रोजी (तक्रार क्र. ३६/२०२६) ठाणेदार दिपमाला भेंडे यांच्यासह तपास अधिकारी विजय लोखंडे, निखिल खेडकर व अमोल खडसे यांच्याविरोधात अधिकृत चौकशी सुरू करून नोटीस बजावली. याच कारवाईमुळे खवळलेल्या स्थानिक पोलिसांनी ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या ताज्या प्राणघातक हल्ल्याची साधी ‘एफआयआर’ (FIR) नोंदवण्यासही साफ नकार दिल्याचा आरोप केला जात आहे.
६ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० च्या सुमारास कृष्णापूर बस स्टॉप फाट्याजवळील निर्जन जंगल परिसरात फिर्यादीच्या चारचाकी वाहनाला आरोपींनी घेरले. लाठ्या-काठ्या आणि लोखंडी शस्त्रांसह आलेल्या टोळीने गाडीच्या काचा फोडून फिर्यादीला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. “लय माजला, याचा माज जिरवा…” अशा अत्यंत हीन, अश्लील व जातीवाचक शिव्या देत सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून ठार मारण्याचा थेट प्रयत्न करण्यात आला. डोफे यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे ते या हल्ल्यातून बचावले; मात्र पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेण्याऐवजी तक्रार दडपून ठेवत आरोपींना एकप्रकारे जाहीर अभय दिले.
पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाहून हल्लेखोरांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. ११ ऑक्टोबर रोजी गावात दुर्गादेवीच्या स्थापनेदरम्यान जुनी परंपरा मोडून, स्थानिक पोलीस पाटील जितेंद्र भानसे याच्या चिथावणीने ६ ऑक्टोबरच्या हल्ल्यातील मुख्य चेहरे नरेश जुनगरे, योगेश डाखोरे, सचिन भुजाडे, समय येंडे, करण गुरनुले व त्यांच्या साथीदारांनी मुद्दाम दुर्गादेवीचा ट्रॅक्टर पीडिताच्या घरासमोर आणून थांबवला. तेथे अत्यंत आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर घोषणाबाजी करण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या काळात गावात केव्हाही अनुचित प्रकार घडून पीडित कुटुंबावर पुन्हा हल्ला होऊ शकतो, अशी अत्यंत भीतीदायक परिस्थिती गावात निर्माण झाली आहे. पोलीस पाटील व त्याचे नातेवाईक दररोज रात्री चौकात मद्यधुंद अवस्थेत दहशत माजवत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. स्थानिक पोलिसांकडून न्याय मिळण्याची शक्यता मावळल्याने अखेर पीडित कुटुंबाने यवतमाळच्या विशेष ॲट्रॉसिटी न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणात भाजप पदाधिकारी सतीश मानलवार यांच्यासह सर्व मुख्य आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्याच्या कडक कलमांखाली व सहकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) तात्काळ गुन्हे नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलम १५-ए नुसार कुटुंबाला २४ तास पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली असून, पदाचा गैरवापर करणारे पोलीस पाटील जितेंद्र भानसे, ग्रामसेवक पी. एम. तालन, मुख्याध्यापिका अश्विनी कोडापे आणि रोजगार सेवक निलेश झामरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
”आमच्या कुटुंबाला किंवा मालमत्तेला काहीही इजा पोहोचल्यास त्यास संपूर्णपणे जिल्हा पोलीस प्रशासन आणि बाभुळगावच्या ठाणेदार जबाबदार राहतील,” असा निर्वाणीचा इशारा फिर्यादीने दिला असून, या प्रकरणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय व पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.(क्रमशः)