🔥यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात भरतीचा काळाबाजार; जाहिरातीविना परस्पर खिसे भरल्याचा विद्यार्थ्यांचा गंभीर आरोप
🔥यवतमाळ शासकीय रुग्णालयात खासगी कंपनीच्या मदतीने पदांचा लिलाव? पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी
यवतमाळ -/ शासकीय सेवेचे स्वप्न डोळ्यात साठवून रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या होतकरू आणि बेरोजगार तरुणांच्या पाठीत प्रशासनानेच खंजीर खुपसल्याचा धक्कादायक प्रकार यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उघडकीस आला आहे. शासकीय पदांची कोणतीही जाहीर नोटीस न काढता, वर्तमानपत्रात साधी जाहिरात प्रसिद्ध न करता, एका लाडक्या खासगी कंपनीच्या संगनमताने वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर ‘चोरट्या मार्गाने’ भरती उरकण्यात आली आहे. सामान्य प्रशासनाच्या आशीर्वादाने आणि महाविद्यालयीन नेतृत्वाच्या मूक संमतीने हा कोट्यवधींचा काळाबाजार झाल्याचा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, या प्रकारामुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
शासकीय अथवा निमशासकीय संस्थांमध्ये रिक्त जागा भरायच्या असल्यास संविधानाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार वृत्तपत्रांमध्ये अधिकृत जाहिरात देणे, आरक्षणाचे नियम पाळणे आणि गुणवत्तेच्या आधारावर निवड करणे बंधनकारक असते. मात्र, यवतमाळ येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने या सर्व नियमांची अक्षरशः होळी केली आहे. विविध संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी कोणतीही अधिकृत प्रसिद्धी वा जाहिरात देण्यात आली नाही. एका खासगी आऊटसोर्सिंग कंपनीला हाताशी धरून, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करत मर्जीतील उमेदवारांना थेट नियुक्तीपत्रे वाटल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार म्हणजे शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पात्र विद्यार्थ्यांच्या हक्कावर दरोडा घालण्यासारखा असल्याची भावना व्यक्त होत आहे. या संपूर्ण पदभरतीचे सूत्रधार रुग्णालयातील सामान्य प्रशासनाकडे होते. ज्या अधिकाऱ्याकडे ही धुरा सोपवण्यात आली होती, त्याच्याच संशयास्पद हालचालींमुळे हा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. भरती प्रक्रियेचा कोणताही अधिकृत रेकॉर्ड सार्वजनिक उपलब्ध नाही. एका ठरावीक खासगी एजन्सीला काम देऊन पात्र उमेदवारांना अंधारात ठेवत कोणत्या निकषांवर ही पदे भरली गेली, याचा कोणताही तपशील दिला जात नाही. त्यामुळे सामान्य प्रशासनातील संबंधित प्रमुख आणि खासगी कंपनी यांच्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पदांचे ‘रेट कार्ड’ ठरवूनच या नियुक्त्या झाल्याचा संशय आता बळावला आहे.
या संशयास्पद भरती प्रकरणाचा छडा लावण्यासाठी काही सजग विद्यार्थी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण महाविद्यालयात विचारणा करण्यासाठी गेले असता, त्यांना अधिकाऱ्यांच्या प्रचंड मुजोरपणाचा सामना करावा लागला. भरतीचे नियम, अर्ज मागवण्याची पद्धत आणि उमेदवारांची यादी याविषयी माहिती मागितली असता, संबंधित वरिष्ठ लिपिकाने उद्धट उत्तरे देत विद्यार्थ्यांचा अपमान केला. “आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? काही माहिती हवी असेल तर माहिती अधिकाराचा (RTI) फॉर्म भरा, नाहीतर निघून जा,” अशा शब्दांत संबंधित कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना हाकलून लावले. जनतेच्या करातून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा मस्तवालपणा पाहता, या भरतीमध्ये दडलेले काळेबेरे उघड होऊ नये म्हणूनच ही अरेरावी सुरू असल्याची खात्री पटत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या या गैरव्यवहारावर विद्यार्थ्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन), सामान्य प्रशासन विभागातील भ्रष्ट अधिकारी आणि संबंधित खासगी कंत्राटदार कंपनी यांनी मिळून हा संपूर्ण ‘काळा बाजार’ रचल्याचा थेट आरोप संतप्त विद्यार्थ्यांनी केला आहे. अत्यंत गोपनीयरीत्या प्रक्रिया राबवून शासकीय पदांची परस्पर विक्री करण्यात आली असून, सर्वसामान्य आणि गुणवत्ताधारक उमेदवारांना डावलून स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम महाविद्यालय प्रशासनाने केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या लाजीरवाण्या प्रकरणामुळे यवतमाळच्या शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री संजय राठोड तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांच्याकडे धाव घेतली आहे. या निवेदनाद्वारे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत भरतीसाठी काढण्यात आलेल्या आदेशांची आणि नेमणुकांची तात्काळ स्थगिती करून निष्पक्ष चौकशी समिती नेमण्यात यावी.
भरतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या संबंधित सामान्य प्रशासन अधिकाऱ्याची व माहिती लपवणाऱ्या कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांचे निलंबन करावे. संबंधित खासगी कंपनीचे कंत्राट तात्काळ रद्द,
🔥महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) यांच्या भूमिकेची सखोल चौकशी व्हावी.
जर जिल्हा प्रशासन आणि शासनस्तरावर या भरती घोटाळ्यातील दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल झाले नाहीत, तर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आहे. आता पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)