🔥सिगारेटच्या धुरातून निर्माण झाला रक्तरंजित राडा;चाकू भोसकून एकाची हत्या
🔥देवळीत मध्यरात्री घडला थरार; एका तासात चार आरोपी जेरबंद, अल्पवयीनही ताब्यात🔥मृतक गजानन किशोर पाटणकर वय वर्ष ४२
देवळी -/ सिगारेट पिण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचा शेवट रक्तरंजित हत्येत झाल्याची धक्कादायक घटना देवळी शहरातील इंदिरानगर परिसरात काल सोमवारी ता.२ नोव्हेंबर रोजी पहाटे एक वाजताच्या सुमारास घडली. गजानन किशोर पाटणकर (वय४२) रा. देवळी असे मृतकाचे नाव आहे. आरोपींनी संगनमताने त्यांना अडवून त्यांच्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाटणकर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून देवळी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या एका तासात चार मुख्य आरोपींना अटक केली, तर एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला देखील याप्रकरणी ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक गजानन पाटणकर आणि आरोपी यांच्यात शहरातील मोहित धाब्यावर सिगारेट पिण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने गैरकायद्याची मंडळी जमविली. आज २ नोव्हेंबरच्या पहाटे गजानन पाटणकर हे आपल्या मित्राला सोडण्यासाठी इंदिरानगर परिसरात गेले असता आरोपींनी त्यांच्या वाहनाला अडविले. त्यानंतर त्यांना पकडून ठेवत चाकूने वार करण्यात आले. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
सदर घटनेची माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. संभाव्य आरोपींचा मार्ग काढत पोलिसांनी अवघ्या एका तासाच्या आत चार मुख्य आरोपींना अटक केली. एका विधीसंघर्षग्रस्त बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरील भौतिक व वैज्ञानिक पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या.
🔥चार आरोपी अटकेत; अल्पवयीन ताब्यात.!
या प्रकरणात अमन संतोष टेकाम, ओम रमेश सावरकर,प्रणय ज्ञानेश्वर राठोड आणि मनोज ज्ञानेश्वर राठोड सर्व रा. देवळी यांना अटक करण्यात आली आहे. एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, प्रमोद मकेश्वर तसेच पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ठाणेदार संदीप कापडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज जाधव, कमलेश मगरे व देवळी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ८२५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.