वणीत डब्ल्यूसीएलच्या सुरक्षा रक्षकाची हत्या; आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद

0

🔥वणीत डब्ल्यूसीएलच्या सुरक्षा रक्षकाची हत्या; आरोपी अवघ्या २४ तासांत जेरबंद

🔥​रात्री तक्रार घेण्यास नकार दिल्याच्या वादातून डोक्यात वार करून केला खून; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यवतमाळ-/ वणी परिसरातील कोलारपिंपरी, प्रगती नगर कॉलनी येथील ‘वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड’च्या (WCL) क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाचा किरकोळ वादातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तत्परता दाखवत अवघ्या २४ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
​ओमप्रकाश हिरा प्रसाद (वय ४५ वर्षे) असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून, अंचल मोहन उईके (वय २८ वर्षे, रा. प्रगती नगर कॉलनी, कोलारपिंपरी, वणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री आरोपी अंचल उईके हा दुचाकीवरून जात असताना कॉलनी परिसरात रानडुकरांचा कळप आडवा आल्याने तो घसरून पडला. या प्रकाराची वणी येथील क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवण्यासाठी तो रात्री सुमारे पावणेअकरा वाजता (१०:४०) कार्यालयात गेला होता. त्या वेळी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक ओमप्रकाश प्रसाद यांनी त्याला “तक्रार देण्यासाठी उद्या सकाळी ऑफिसमध्ये या,” असा सल्ला दिला.
​यावरून “माझी तक्रार आताच्या आताच घ्या,” असा हट्ट धरत अंचलने प्रसाद यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या अंचलने ओमप्रकाश प्रसाद यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाचे वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी होऊन प्रसाद यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनेच्या वेळी प्रगती नगर येथील अंचल उईके घटनास्थळी संशयास्पदरीत्या उपस्थित असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. ​माहितीची खातरजमा करून पथकाने शोध घेत २ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास अंचलला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवत सखोल विचारपूस केली असता, त्याने वादातून सुरक्षा रक्षकाचा खून केल्याची कबुली दिली. ​ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष चवरे, सपोनि दत्ता पेंडकर, सपोनि गजानन राजमलु, पोउपनि धनराज हाके, पोउपनि शिवशंकर कायंदे, पोउपनि सागर इंगळे यांच्यासह पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास वणी पोलीस करत आहेत. 

ब्युरो रिपोर्ट साहसिक News -/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!