🔥साक्षी मुटे यांचा शैक्षणिक पराक्रम,बीएएमएसच्या चारही वर्षात प्रथम क्रमांक,चार सुवर्णपदकांची कमाई..
वर्धा -/ महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र सालोड (हि.) येथील विद्यार्थिनी साक्षी मुटे हींनी बीएएमएसच्या चारही शैक्षणिक वर्षांमध्ये प्रथम क्रमांक पटकावत चार सुवर्णपदकांची घवघवीत कमाई केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे या सुवर्णपदकांचे वितरण प्रा. डॉ. प्रीती अदाणी, सर्जन वाइस अॅडमिरल श्रीमती आरती सरिन (AVSM, VSM) आणि माननीय श्री. दत्ताजी मेघे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हा क्षण साक्षीसाठी अत्यंत गौरवाचा आणि संस्मरणीय ठरला.
साक्षीने आयुर्वेदाच्या कठीण अभ्यासक्रमात सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली असून तिच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक सर्वत्र होत आहे. या यशामागे तिची मेहनत, चिकाटी आणि अभ्यासातील निष्ठा दिसून येते.
आपल्या भावना व्यक्त करताना साक्षी मुटे म्हणाली, “हे यश माझ्या आई-वडिलांचे, शिक्षकांचे आणि मित्रपरिवाराचे आहे. त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजाच्या सेवेसाठी काम करण्याची माझी इच्छा आहे.”
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भारत राठी यांनी साक्षीचे कौतुक करताना सांगितले, “चारही वर्षात सुवर्णपदक पटकावणे ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे. साक्षीने आपल्या ज्ञान, मेहनत आणि सातत्याने संपूर्ण महाविद्यालयाचा गौरव वाढवला आहे. ती निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरेल.”
साक्षी ही सविता मुटे आणि कृष्णाजी मुटे यांची कन्या असून, त्यांच्या कुटुंबातील ही शैक्षणिक वाटचाल विशेष अभिमानास्पद आहे.
साक्षीच्या या यशामुळे आयुर्वेद क्षेत्रातील अभ्यास, संशोधन आणि सामाजिक आरोग्य सेवेसाठी तिच्यासमोर अनेक सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत.