लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये भारतातील “अत्यंत दुर्मीळ” हृदयाचा केस यशस्वी!

0

🔥लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये भारतातील “अत्यंत दुर्मीळ” हृदयाचा केस यशस्वी!

🔥रुग्णाचे हृदय उजव्या बाजूला… तातडीची निःशुल्क अँजिओप्लास्टी करून वाचवले प्राण!

 हिंगणा -/ लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे हृदयरोग विभागाने भारतातील अत्यंत दुर्मीळ आणि जटिल असा हृदयविकाराचा केस यशस्वीरित्या हाताळत एका सत्तर वर्षांच्या आजींचे प्राण वाचवले आहेत. सावनेर येथील या आजींना छातीत तीव्र दुखणे व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच त्यांची त्वरित तपासणी करून ईसीजी काढण्यात आला, त्यामध्ये हृदयाशी संबंधित बदल दिसून आले.

🔥हृदय नेहमीच्या जागी नव्हते… डॉक्टरांना आला संशय!

पुनर्तपासणी करताना सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. हितेंद्र भागवतकर यांच्या लक्षात एक अत्यंत वेगळा आणि गंभीर मुद्दा आला. इको तपासणीमध्ये हृदय नेहमी ज्या ठिकाणी असते त्या बाजूला दिसत नव्हते. पुढील तपासणीनंतर स्पष्ट झाले की या आजींचे हृदय उजव्या बाजूला आहे. ही अवस्था जन्मजात असून ती अत्यंत दुर्मीळ मानली जाते, तसेच ७० वर्षांच्या वयात पहिल्यांदा अशी स्थिती निदान होणे भारतात अत्यंत दुर्मीळ असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात आले.

🔥अँजिओग्राफी अवघड… तरीही टीमचा यशस्वी पराक्रम!

हृदयाची रचना वेगळी आणि रक्तवाहिन्यांची दिशा उलटी असल्याने तात्काळ अँजिओग्राफी करणे ही प्रक्रिया अत्यंत अवघड आणि जटिल होती. मात्र अनुभवी टीमने अचूक पद्धतीने अँजिओग्राफी यशस्वी केली. या तपासणीत LAD धमनीमध्ये ९० टक्के अडथळा आढळून आला. त्यानंतर तातडीने रुग्णावर यशस्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि आजींचे प्राण वाचविण्यात आले.

🔥महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत संपूर्ण उपचार मोफत

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत या रुग्णाचे सर्व उपचार व प्रक्रिया निःशुल्क करण्यात आल्या. उपचारानंतर कोणतीही गुंतागुंत न होता आजींची प्रकृती सध्या ठणठणीत असून त्यांना चांगल्या अवस्थेत घरी पाठवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे, बाहेरील रुग्णालयात “हृदयविकाराचा झटका” आल्याचे सांगण्यात आले होते व त्या अनुषंगाने औषधे देण्यात आली होती.
आतापर्यंत ७ हजारहून अधिक निःशुल्क अँजिओप्लास्टी

डॉ. हितेंद्र भागवतकर यांच्या नेतृत्वात लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे हृदयरोग विभाग व हृदय शास्त्रक्रिया विभाग कार्यरत असून शासकीय योजनेअंतर्गत आतापर्यंत ७ हजारपेक्षा जास्त निःशुल्क अँजिओप्लास्टी करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली.
वरिष्ठांकडून अभिनंदन
ही भारतातील दुर्मीळ केस यशस्वीरित्या हाताळल्या बद्दल संस्थेचे उपाध्यक्ष आमदार डॉ. आशिषराव देशमुख, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, उपअधिष्ठाता व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन देवस्थळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनुज तिवारी, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुश्रुत फुलारे आदींनी हृदयरोग विभागाच्या चमूचे अभिनंदन केले आहे.

गजानन ढाकुलकर साहसिक News-/24 हिंगणा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!