पुसदमध्ये बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश; आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ५०० च्या नोटा छापताना पोलिसांनी घातला छापा….

0

🔥पुसदमध्ये बनावट नोटांच्या कारखान्याचा पर्दाफाश;
आंतरजिल्हा टोळी जेरबंद, ५०० च्या नोटा छापताना पोलिसांनी घातला छापा.

​यवतमाळ-पुसद -/ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात बनावट नोटा तयार करून त्या बाजारात पसरवणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा पुसद पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मौजा बोरी खुर्द येथे सुरू असलेल्या एका छापखान्यावर धाड टाकून पोलिसांनी रंगेहाथ दोन आरोपींना अटक केली असून, बनावट नोटांसह प्रिंटर, स्कॅनर आणि दुचाकी असा एकूण १ लाख ९० हजार ६७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून बनावट नोटांचे रॅकेट किती खोलवर पसरले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
​गुप्त माहितीवरून रचला सापळा
​मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, १७ जानेवारी २०२६ रोजी पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली होती. मौजा बोरी खुर्द (ता. पुसद) येथील एका घरात काही व्यक्ती भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करत आहेत, अशी माहिती मिळताच पोलिसांनी या माहितीची खात्री केली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.
​नोटा छापताना आरोपींना पकडले
​पोलीस पथकाने बोरी खुर्द येथील विनोद केरबाजी कुरूडे याच्या घराची झडती घेतली. हे घर गावातील कॅनॉलच्या जवळ आहे. पोलिसांनी अचानक छापा टाकला असता, तिथे दोन इसम कलर स्कॅनर आणि प्रिंटरच्या साहाय्याने ५०० रुपयांच्या नोटांच्या कलर प्रिंट काढताना रंगेहाथ मिळून आले. पोलिसांनी जागीच दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांची चौकशी केली.
​अटक करण्यात आलेले आरोपी ची नावे याप्रमाणे १. संतोष जगदेवराव सुर्यवंशी (वय ५० वर्षे), रा. कळमनुरी, जि. हिंगोली.
२. गणेश धर्मा गायकवाड (वय ४६ वर्षे), रा. आझाद चौक, पुसद.
​या कारवाईत मुख्य सूत्रधार मानला जाणारा विनोद केरबाजी कुरूडे (वय ५० वर्षे), रा. बोरी खुर्द हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
​​पोलिसांनी घटनास्थळावरून बनावट नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे ​५०० रुपयांच्या १५ बनावट नोटा. ​५०० रुपयांच्या ४ अस्सल चलनी नोटा. ​एक उच्च दर्जाचा कलर स्कॅनर प्रिंटर.
​मोबाईल फोन. ​एक मोटरसायकल आणि एक मोपेड. ​नोटा तयार करण्यासाठी लागणारे केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य.
​एकूण किंमत: १,९०,६७५/- रुपये.
​आरोपींची कबुली आणि गुन्ह्याची व्याप्ती
​अटक केलेल्या आरोपींनी चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी कबूल केले की, विनोद कुरूडे यानेच त्यांना बनावट नोटा तयार करण्यासाठी बोरी खुर्द येथे बोलावले होते आणि त्याच्या सांगण्यावरूनच ते हे काम करत होते. आरोपी संतोष सुर्यवंशी हा हिंगोली जिल्ह्यातील असल्याने ही टोळी आंतरजिल्हा स्तरावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. हे आरोपी आतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात फिरवून बसले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
​भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
​या प्रकरणी पुसद शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ४५/२०२६ नुसार कलम १७८, १८०, १८१ आणि ३(५) भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून फरार विनोद कुरूडेचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
​कारवाईत सहभागी अधिकारी
​ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहा. पोलीस अधीक्षक तथा एसडीपीओ हर्षवर्धन बी. जे. यांच्या नेतृत्वात पोहवा सुनील मदने, पंकज पातुरकर, शंकर टाळीकुटे, खुशाल चव्हाण, पोअं सय्यद जुनैद अली, सपोनि प्रेमकुमार केदार, पोहवा मनोज कदम, पोअं शुद्धोधन भगत आणि आकाश बाभुळकर यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ,वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!