🔥यवतमाळ वनविभागात ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’; अवैध सागवान तस्करी प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोकाटच!

🔥​मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात; वनपरिक्षेत्र अधिकारी प्रणाली धर्माळे यांना अभय का?

यवतमाळ -/ वनविभागांतर्गत येणाऱ्या वडगाव (धानोरा) वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलात झालेल्या लाखो रुपयांच्या अवैध सागवान वृक्षतोडीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र, या गंभीर प्रकरणात जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा बळी देऊन मूळ प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे चित्र दिसत आहे. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ या उक्तीप्रमाणे क्षेत्रसहाय्यक प्रकाश जाधव आणि महिला वनरक्षक स्वाती अघम यांना निलंबित करण्यात आले आहे, तर मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) प्रणाली धर्माळे यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
​​वडगाव (धानोरा) वनपरिक्षेत्राच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या मौल्यवान सागवान वृक्षांची कत्तल सुरू होती. ठेकेदारांनी राखीव वनातील नियमांना हरताळ फासत ही वृक्षतोड केली. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर यवतमाळ वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक (CCF) किशोर मानकर यांनी घाईघाईने शुक्रवारी दोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले. मात्र, स्थानिक नागरिक आणि जाणकारांच्या मते, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय शक्यच नाही. ​या संपूर्ण प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी प्रणाली धर्माळे यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे. कंत्राटदारांनी राखीव वनात घुसून सागवान तोडले असतानाही, धर्माळे यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याऐवजी त्यांना पाठीशी घातल्याचा आरोप होत आहे. वनवर्तुळात अशी चर्चा आहे की, या प्रकरणात मोठा ‘अर्थपूर्ण’ व्यवहार झाला असून, याच व्यवहारामुळे मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. चौकशी समिती नेमणे हा केवळ वेळकाढूपणा असून प्रकरण दडपविण्याचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे.
​चौकशी समितीचा अहवाल आणि तांत्रिक त्रुटी
​मुख्य वनसंरक्षकांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या प्रमुख, विभागीय महिला वन अधिकारी (मोबाईल स्कॉड) पी.बी. पठाण यांनी पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत:
​हॅमरचा गैरवापर: तोडलेल्या वृक्षांवर मारण्यात आलेले ‘हॅमर’ (शासकीय हातोडा) हे अवैध वृक्षतोड लपवण्यासाठी मारण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
​मोजणीत कसूर: नियमानुसार अशा संवेदनशील भागात भूमापकाकडून मोजणी करणे बंधनकारक असते, मात्र एसीएफ (ACF) आणि त्यांच्या अधिनस्त यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.
​पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न: शासकीय चिन्हांचा गैरवापर करून पुराव्यांशी छेडछाड करण्यात आली आहे. कायद्यानुसार हा गंभीर फौजदारी गुन्हा असून यात दोन वर्षांच्या सक्त मजुरीची तरतूद आहे.
​​एकीकडे दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करून प्रशासन आपली पाठ थोपटून घेत असताना, दुसरीकडे जंगलाची लूट करणारे कंत्राटदार आणि त्यांना मदत करणारे दलाल अद्यापही वनविभागाच्या हाती लागलेले नाहीत. यावरून वनविभागाची यंत्रणा केवळ ‘छोट्या माशांना’ पकडण्यात मग्न असून ‘मगरींना’ अभय दिले जात असल्याचे स्पष्ट होते.
​​राखीव वनातील ही लूट म्हणजे सरकारी मालमत्तेवर झालेला दरोडाच आहे. जर क्षेत्रसहाय्यक आणि वनरक्षक जबाबदार आहेत, तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी (ACF) यांना क्लिन चिट का? प्रणाली धर्माळे यांच्यावर अद्याप फौजदारी गुन्हा का दाखल झाला नाही? मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांची भूमिका या प्रकरणात पारदर्शक का नाही? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
​​वडगाव (धानोरा) येथील हे प्रकरण केवळ वृक्षतोडीपुरते मर्यादित नसून, यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे दिसत आहे. चौकशी समितीच्या ‘स्टेप बाय स्टेप’ तपासणीत भविष्यात मोठे मासे गळाला लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात असली, तरी सध्याची कारवाई ही केवळ ‘डोळ्यात धूळफेक’ करणारी ठरत आहे. जर या प्रकरणात दोषी असलेल्या आरएफओ आणि कंत्राटदारांवर कडक कारवाई झाली नाही, तर वनविभागाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होईल.
​पुढील पाऊल: या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी आम्ही मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच यातील ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराचे धागेदोरे उघड होतील.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ-वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!