सटोडिया निलेश पिपराणी आणि पोलीस कर्मचारी अंकुश फेनडर यांचा यवतमाळात उघड काळाबाजार

0

🔥हाच तो सटोडिया निलेश पिपरानी व त्याचा भाचा पोलीस अंमलदार अंकुश फेनडर

🔥सटोडिया निलेश पिपराणी आणि पोलीस कर्मचारी अंकुश फेनडर यांचा यवतमाळात उघड काळाबाजार

🔥सट्टा अन् भिंगरीच्या जाळ्यात शेकडो तरुण उद्ध्वस्त!

🔥निलेश पिपराणीच्या बेकायदेशीर साम्राज्याला पोलीस अंमलदार अंकुश फेनडर यांचे कथित संरक्षण? ‘

🔥मामा-भाच्या’च्या जोडीविरोधात कारवाईचे आव्हान

यवतमाळ -/ शहराला लागलेली अवैध धंद्यांची कीड आता तरुणाईच्या मुळावर उठली असून, सटोडिया निलेश पिपराणी आणि शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अंकुश फेनडर यांच्या कथित युतीने शहरात गुन्हेगारीचे मोठे जाळे निर्माण केल्याचे गंभीर आरोप होत आहेत. शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि सुशिक्षित बेरोजगारांना क्रिकेट सट्ट्याच्या ऑनलाइन आयडीचे आमिष दाखवून कंगाल केले जात आहे. सट्ट्यात हरलेल्या तरुणांना पोलिसांचा धाक दाखवून बेकायदेशीरपणे कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळली जात असून, आता या टोळीने आपला मोर्चा भिंगरीच्या जुगाराकडे वळवला आहे. कायद्याचे रक्षकच भक्षकांच्या भूमिकेत आल्याची चर्चा रंगत असल्याने, यवतमाळ पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरात क्रिकेट बेटिंग, जुगार आणि अवैध सावकारीने मर्यादा ओलांडल्या असून, या संपूर्ण काळ्या साम्राज्यामागे सटोडिया निलेश पिपराणी आणि शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस अंमलदार अंकुश फेनडर यांचे साटेलोटे असल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात उघडपणे सुरू आहे. क्रिकेट सट्ट्याच्या माध्यमातून शहरात अफाट काळी संपत्ती गोळा करणाऱ्या या ‘मामा-भाच्या’च्या जोडीने आता थेट ‘भिंगरी’च्या जुगारातही प्रवेश केला असून, प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा गोरखधंदा सुरू आहे. ​गेल्या काही महिन्यांपासून यवतमाळ शहरातील महाविद्यालयांत शिकणारे तरुण, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि सुशिक्षित बेरोजगार युवक या टोळीच्या मुख्य निशाण्यावर आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निलेश पिपराणी याच्या नेटवर्ककडून तरुणांना क्रिकेट सट्ट्याची ‘ऑनलाइन आयडी’ सहज उपलब्ध करून दिली जाते. सुरुवातीला नफ्याचे आमिष दाखवून तरुणांना या दलदलीत ओढले जाते. एकदा का व्यक्ती या व्यसनात अडकली की, सट्ट्यातील फिक्सिंग आणि गणिताच्या आधारे त्यांना लाखो रुपयांच्या कर्जात बुडवले जाते.

​या संपूर्ण रॅकेटचे सर्वात धक्कादायक आणि संतापजनक वास्तव म्हणजे वसुलीची पद्धत. सट्ट्यामध्ये पैसे हरलेल्या तरुणांना किंवा त्यांच्या हवालदिल पालकांना थेट शहर पोलीस स्टेशनमधील कर्मचारी अंकुश फेनडर यांच्या नावाने धमक्या दिल्या जातात. “पैसे दिले नाहीत तर थेट जुगाराच्या गुन्ह्यात आत टाकू, करिअर उद्ध्वस्त करू,” असा दम भरून फेनडर यांच्या पदाचा आणि वर्दीचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप होत आहेत. भीतीपोटी अनेक कुटुंबे घरे, शेतजमीन आणि दागिने विकून ही कथित देणी फेडत आहेत, तर अनेक तरुण शहरातून परागंदा झाले आहेत.

​सट्टा आणि दहशतीच्या जोरावर कमावलेल्या कोट्यवधी रुपयांच्या काळ्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठी निलेश पिपराणी याने आता शहरात ‘प्रॉपर्टी कार्ड’ आणि बेकायदेशीर स्थावर मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचा मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. सामान्य नागरिकांची फसवणूक करून, सट्ट्यातील वसुलीपोटी थेट जमिनी आणि मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेण्याचा हा प्रकार शहरात वेगाने फोफावत आहे. अवैध धंद्यातून आलेला पैसा अशा प्रकारे पांढरा करण्याचा उद्योग उघडपणे सुरू असताना महसूल आणि तपास यंत्रणा डोळेझाक का करत आहेत, असा संतप्त सवाल यवतमाळकर विचारत आहेत.

​क्रिकेट सट्ट्यापुरते मर्यादित न राहता या जोडीने आता ग्रामीण व शहरी भागातील गरिबांना लुटणाऱ्या भिंगरी जुगारातही हातपाय पसरले आहेत. शहराच्या विविध भागांत छुप्या पद्धतीने चालणाऱ्या या अड्ड्यांना पोलिसांचे अंतर्गत संरक्षण लाभत असल्याचा संशय बळावला आहे. ‘मामा-भाच्या’ची ही जोडी शहरात सध्या कुख्यात झाली असून, कायद्याच्या रक्षकांनीच जर गुन्हेगारांशी हातमिळवणी केली, तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

​यवतमाळ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजवणारे हे रॅकेट उघडे पडल्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेणे काळाची गरज बनली आहे. वर्दीचा गैरवापर करणारे अंकुश फेनडर यांच्या विभागीय चौकशीसह सटोडिया निलेश पिपराणी याच्या बेनामी संपत्तीची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी होणार का? या दोघांवर मोक्का किंवा तडीपारीसारखी कठोर कारवाई करून यवतमाळकरांना या विळख्यातून मुक्त केले जाईल का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!