शालेय हॉकी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या दीपचंद चौधरी विद्यालयाच्या खेळाडूंची सेलू नगरीतून भव्य मिरवणूक.
सेलू : नुकताच ग्वाल्हेर येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय शालेय हॉकी क्रीडा स्पर्धेत दीपचंद चौधरी विद्यालयाच्या चौदा वर्षे वयोगटातील महाराष्ट्राच्या हॉकी संघात कु.प्राची मोरेश्वरराव कटरे व कु.लावण्या बंडूजी बावणे या दोन विद्यार्थिनींचा तर गौरव मारोती धानकुटे या विद्यार्थ्याचा समावेश होता. या स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून परतल्यानंतर सेलू नगरीत त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. तसेच विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. ग्रामीण भागातील खेळाडूंनी केलेल्या अभूतपूर्व यशाचे कौतुक म्हणून शाळेतर्फे त्यांची सेलू नगरीतून वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान गावात ठिकठिकाणी या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करून सेलू पंचक्रोशीतील नागरिकांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका या स्वतः हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू आहेत. क्रीडाशिक्षिका म्हणून नियुक्त झालेल्या सौ. एस. बी. पोहाणे (वंजारी) यांनी आपल्या अनुभव व कौशल्याच्या जोरावर शाळेत हॉकीच्या खेळाची सुरुवात केली होती. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असून सर्वसाधारणपणे या खेळात शहरी खेळाडूंचेच प्राबल्य दिसून येते. तरीही सेलूसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हॉकीच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या शिक्षिकेने प्रामाणिक व अविरतपणे केले असून अनेक पारंगत खेळाडू सेलूच्या मातीतून त्यांनी घडविलेले आहेत. याचा प्रत्यय म्हणून यावर्षी शालेय हॉकी स्पर्धेत दीपचंद चौधरी विद्यालयाच्या खेळाडूंनी सौ. पोहाणे यांच्या मार्गदर्शनात सांगली येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व केले होते, ही बाब उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना पोहोचविण्यात सौ. पोहाणे यांची परखड मेहनत अखेर फलद्रुप झाली. खेळाडूंच्या यशामुळे शाळेच्या गौरवशाली इतिहासात हॉकीच्या माध्यमाने आणखी एक भर पडल्याने शाळेचा लौकिक वाढला आहे. खेळाडूंनी आपल्या येशाचे श्रेय वर्धा जिल्हा हॉकी असोसिएशन सचिव. श्री क्रिष्णा जोशी यांना व सहसचिव सौं सुहासिनी वंजारी यांना दिले
विद्यार्थ्यांना प्रशिक्षणस्थळी दाखल करण्यापासून तर परत येईपर्यंतची पालकत्वाची सर्व जबाबदारी शाळेतील शिक्षक संजय बारी यांनी यशस्वीपणे सांभाळली.
सागर राऊत व चैतन्य कांबळे यांनी खेळाडूंचा मैदानावर नियमित कसून सराव घेतला आणि त्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. पालकांनीही योग्य ते सहकार्य करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. जिल्हा हॉकी संघटना व जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडून सुद्धा यथोचित सहकार्य मिळाले.
शाळेच्या प्राचार्या सौ. एस. बी. पोहाणे (वंजारी), संस्थेचे पदाधिकारी नवीनबाबू चौधरी, अनिलबाबू चौधरी, युवराजजी राठी, सेलूच्या नगराध्यक्षा स्नेहल देवतारे, त्रिशूल चौधरी, शालीग्राम कापसे, नरेंद्र सारस्वत व इतर पदाधिकाऱ्यांनी या खेळाडूंचा सत्कार करून त्यांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच डॉ. कल्पना मकरंदे, व्ही. एम. चांदेकर, जी. बी. खंडागळे, प्रा. मंगेश वडुरकर, एच. जे. मुडे, हेमंत घोडमारे, प्रशांत चव्हाण, यु. व्ही. पिंपरापुरे, प्रवीण घोडखांदे, मीनाक्षी सोमनाथे, शशांक हुलके, ज्योती उमाटे, सचिन तेलरांधे, मिथुन हांडे यांचेसह सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना शाबासकी देऊन त्यांचे अभिनंदन केले. या गुणी खेळाडूंना अनेकांकडून बक्षिसे प्राप्त झाली असून सर्व स्तरातून त्यांचा गुणगौरव केला जात आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय शाळेतील क्रीडा शिक्षकांना, आपले माता-पिता व त्यांच्या वरीष्ठ खेळाडूंना दिले.
सागर राऊत साहसिक न्यूज /24सेलू
