🔥दै.साहसिकच्या पाठपुराव्याला मोठे यश; शेतशिवारातील फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या ‘हार-जित’च्या खेळाचा स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश.
यवतमाळ -/ जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध यवतमाळ पोलिसांनी आता कंबर कसली असून, उमरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतशिवारातील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या हायटेक जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गुरुवारी मोठी कारवाई केली. या धाडसी कारवाईत १६ जुगारांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह तब्बल ९ लाख ८७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात ‘दै. साहसिक’ ने सातत्याने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, ज्याची दखल घेत ही कारवाई करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांनी आपल्या पथकांना सतर्क केले होते. दरम्यान, उमरखेड हद्दीतील राजू गव्हाणे यांच्या शेतातील फार्म हाऊसमध्ये लपून-छपून मोठ्या प्रमाणावर हार-जितचा पत्ता जुगार खेळला जात असल्याची विश्वसनीय गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या खातरजमेनंतर, पोलीस निरीक्षकांनी तातडीने पथकाला घटनास्थळी रवाना केले. पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने फार्म हाऊसवर छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र पथकाने घेराबंदी करून १६ जणांना जाळ्यात ओढले.
या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी केवळ स्थानिक नसून शेजारील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातूनही येथे जुगार खेळण्यासाठी आले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये
उमरखेड येथील आरोपी सूरज जोगिंदर गुप्ता (३५, बाळदी), सय्यद रसूल सय्यद मुसा (५१, रोहीलेपुरा), संतोष सूर्यभान जोगदंड (४०, चिलगव्हाण), शेख रमजान शेख फरीद (३२, उमरखेड), शरद भारत राठोड (४०, ढाणकी).
नांदेड जिल्ह्यातील आरोपी नितेश क्रिष्णा राठोड (२६, दत्तबर्डी), टिकाराम उमाजी चव्हाण (३८, दत्तबर्डी), मनोहर दत्तराव जाधव (३९, पोळी), सै. सोहल अली (३२, तिवरठा), सै. पाशु सै. रहिमोद्दीन (२८, देगलूर फाटा), शिवाजी केशवराव कदम (३७, बैसा), अशोक नारायण शिंदे (२४, मिरकसवाडी), शेख शहबाज शेख रफीक (३६, खडकपुरा), नारायण भीमराव चव्हाण (४५, हिंगोली नाका).
आरोपी ग्यानबा किसन चिकणे (२९, टेंभी, महागाव) आणि शेख बादशहा शेख हुसेन (६०, राणी धानोरा, आर्णी).यांच्याकडुन पोलिसांनी घटनास्थळावरून आणि आरोपींच्या झडतीतून मोठा ऐवज हस्तगत केला आहे: रोख रक्कम: ८,०२,०४० रुपये. मोबाईल संच: १० नग (किंमत अंदाजे ६५,००० रुपये).
वाहने: ०८ मोटार सायकली (किंमत १,२०,००० रुपये). एकूण जप्त मुद्देमाल: ९,८७,०४० रुपये.
🔥दैनिक साहसिकच्या पाठपुराव्याला यश.
उमरखेड आणि आजूबाजूच्या परिसरात शेतशिवाराचा आडोसा घेऊन अनेक हायटेक जुगार अड्डे फोफावले असल्याची ओरड होत होती. ‘दै. साहसिक’ ने या संदर्भात वारंवार वृत्त प्रसिद्ध करून या अवैध व्यवसायांमुळे तरुणाई कशी बरबाद होत आहे आणि गुन्हेगारी कशी वाढत आहे, यावर प्रकाश टाकला होता. या वृत्तांची दखल घेत पोलीस प्रशासनाने ही धडक कारवाई केल्याने सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
🔥कारवाई करणारे पथक.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे, सपोनि पवन राठोड, धीरज बांडे, पोउपनि गजानन राजमल्लू, शरद लोहकरे आणि एलसीबीच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
सध्या सर्व आरोपींविरुद्ध उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास उमरखेड पोलीस करीत आहेत. या कारवाईमुळे यवतमाळ जिल्ह्यातील जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत.