🔥देवळीत प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष तिरंग्याच्या साक्षीने उसळला देशभक्तीचा महोत्सव.
देवळी -/विविधतेत एकता या भारतीय लोकशाहीच्या महान मूल्यांचे दर्शन घडवत ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन देवळी शहरात अभूतपूर्व उत्साहात, शिस्तबद्धतेत आणि देशभक्तीच्या भारलेल्या वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शहरात राष्ट्रप्रेमाची लहर होती. प्रत्येक चौक, शाळा, कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंगा डौलाने फडकत होता.
देवळी तहसील कार्यालयात तहसीलदार समर्थ शिरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताच्या सन्मानाने संपूर्ण परिसर भारावून गेला. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस दल,विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधले. पंचायत समिती देवळी येथे बीडीओ प्रफुल्ल लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
नगरपरिषद कार्यालयात नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याधिकारी नेहा अकोडे, उपनगराध्यक्ष राहुल चोपडा, तसेच सर्व प्रभागांतील नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
राजकीय व सामाजिक संस्थांनीही देशभक्तीचा जागर केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयात नगरपरिषद गटनेते अशोक राऊत, कृषी उत्पन्न बाजार समितीत उपसभापती संजय कामनापुरे, खरेदी-विक्री संघात अध्यक्ष अमोल कसणारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देवळी पोलीस ठाण्यात ठाणेदार अमोल मंडाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले पोलीस दल व होमगार्ड यांनी राष्ट्रीय झेंड्याला मानवंदना दिली.
शैक्षणिक क्षेत्रातही प्रजासत्ताक दिनाचा उत्साहात साजरा करण्यात आला. जनता हायस्कूल येथे संस्थाध्यक्ष रवी शेंडे, एस.एस.एन.जे. महाविद्यालयात प्राचार्या सुनीता सोनारे, यशवंत कन्या शाळेत मुख्याध्यापिका, नगरपरिषद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सुजन कॉन्व्हेंट येथे अध्यक्ष डॉ. श्रद्धा चौरे, तर गुरुकुल कॉन्व्हेंट येथे समाजसेवक मोहन जोशी यांच्या हस्ते प्राचार्य योगेश ढोरे याच्या ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतांनी व भाषणांनी परिसर भारावून टाकला.
देवळीच्या ऐतिहासिक वारशाला उजाळा देत युवा क्रांती स्मारक, शहीद स्मारक, स्वातंत्र्यसैनिक महादेवराव ठाकरे चौक आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौक येथे मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. शहीदांच्या स्मृतींना अभिवादन करत नागरिकांनी राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करण्याचा संकल्प केला.
विशेष आकर्षण ठरल्या त्या देवळी शहरातील विविध शाळांच्या भव्य देशभक्ती रॅल्या. भारत माता की जय, वंदे मातरम् आणि जय जवान जय किसान च्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. या रॅल्या तहसील कार्यालयातील मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात सहभागी झाल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त देवळी शहराने केवळ उत्सव साजरा केला नाही, तर भारतीय संविधानावरील निष्ठा, लोकशाही मूल्यांवरील विश्वास आणि राष्ट्रसेवेचा संकल्प ठामपणे व्यक्त केला.