🔥वानाडोंगरी नगर परिषदेतील बे-कायदेशीर ले-आउटचा मोठा घोटाळा! जबाबदार अधिकारी कारवाई टाळत असल्याचा आरोप.
हिंगणा -/ वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील शहाकार गृह निर्माण सहकारी सोसायटीच्या बे-कायदेशीर ले-आउट घोटाळ्याने प्रशासनाचे डोकेदुखी वाढवली असून, आता हा विषय सरळसरळ भ्रष्टाचार व जबाबदार अधिकाऱ्यांची टाळाटाळ याकडे निर्देश करतोय. या प्रकरणातील गंभीर अनियमितता दडपली जात असल्याच्या संशयावरून सामाजिक कार्यकर्ते गजानन ढाकुलकर यांनी आज दिनांक ३० सप्टेंबर रोजी माहितीचा अधिकार कायदा, २००५ अंतर्गत अर्ज दाखल करत प्रशासनाला थेट जाब विचारला आहे.
महत्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री सचिवालयाने यापूर्वीच या घोटाळ्यावर कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. मा. सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय यांचे पत्र क्र. २५/शून्य ०२०९४ दिनांक ११ जून २०२५ नुसार, जिल्हा प्रशासनाने नगर परिषद वानाडोंगरीला १७ जून रोजी आदेश दिला होता की, नियमोचित कारवाई करून केवळ ३ दिवसांत अहवाल सादर करावा.
मात्र आजवर हा अहवाल सादर झालेला नाही की काय, यावरच संशय निर्माण झाला आहे. ढाकुलकर यांनी आपल्या अर्जात स्पष्ट दोन मागण्या केल्या आहेत – १ नगर परिषद वानाडोंगरीने अहवाल सादर केला असल्यास, त्याची अधिकृत प्रत द्यावी. २ अहवाल सादर न केल्यास, जिल्हा प्रशासनाने जबाबदार अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली याची माहिती द्यावी.
या प्रकरणामुळे प्रशासनातील निष्क्रियता, बेपर्वाई व संभाव्य भ्रष्टाचाराचे जाळे उघड होण्याची शक्यता प्रबळ झाली आहे. नागरिकांच्या डोळ्या देखत बे-कायदेशीर ले-आउट वाढत आहेत, पण अधिकारी मात्र फाईल दाबून बसल्याचे चित्र समोर येत आहे.
ढाकुलकर यांच्या या कारवाईनंतर आता एकच प्रश्न निर्माण झाला आहे – बे-कायदेशीर ले-आउटच्या घोटाळ्यामागे कोणते मोठे हात आहेत, आणि अधिकारी नेमके कोणाला वाचवतात ?