🔥आदर्श ग्राम पळसगाव येथील विकासकामांना विरोधकांचा खोडा; प्रशासनास बदनाम करण्याचा प्रयत्न उघड.
वर्धा-पळसगाव -/आदर्श ग्राम म्हणून जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेल्या पळसगाव बाई येथे सुरू असलेल्या महत्त्वाच्या विकासकामांना विरोधकांकडून खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. माजी सरपंच धीरज लेंडे यांच्या पुढाकारातून आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत राबविण्यात येत असलेली संरक्षण भिंत व नदी खोलीकरणाची कामे चुकीच्या पद्धतीने सादर करून प्रशासन व अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र काही समाजकंटकांकडून रचले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पळसगाव बाई गावाला दरवर्षी पावसाळ्यात नदीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसत होता. नदीला पूर आल्यास पाणी थेट वस्तीमध्ये शिरत असल्याने घरांचे नुकसान, शेतीचे नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठे हानीकारक परिणाम होत होते. ही बाब लक्षात घेऊन माजी सरपंच धीरज लेंडे यांच्या प्रयत्नातून आपत्ती व्यवस्थापन निधीअंतर्गत पुलाच्या बाजूने संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर नदी खोलीकरणाचा समावेशही या कामात करण्यात आला असून भविष्यात पूरस्थिती टाळणे हा या कामाचा मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, संरक्षण भिंतीसाठी नाली खोदताना आणि नदी खोलीकरण करताना मोठ्या प्रमाणात माती निघत आहे. ही माती गावातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल भागात, तसेच पूर्वी खोल गेलेल्या सार्वजनिक जागा समतल करण्यासाठी समाज सहभागाच्या माध्यमातून टाकण्यात आली आहे. या प्रक्रियेत ग्रामस्थांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून देत लोकसहभागातून कामे केली आहेत. या सर्व बाबींची पूर्वकल्पना ग्रामपंचायतीला देण्यात आलेली असून समाज सहभागाची नोंदही ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आलेली आहे.
मात्र, या सकारात्मक आणि लोकहिताच्या कामालाही काही विरोधकांची नजर लागली आहे. नदी खोलीकरणाचे काम सुरू असताना पोकलेन यंत्राच्या सहाय्याने खोदकाम होत असल्याचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. या व्हिडिओंचे खरे स्वरूप न सांगता, अर्धवट व चुकीची माहिती देत हे काम बेकायदेशीर असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला. यामागे अधिकारी व प्रशासनाची प्रतिमा मलिन करणे आणि विकासकामांना अडथळा आणणे हाच उद्देश असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
यासंदर्भात माजी सरपंच धीरज लेंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “गावाचा विकास करीत असताना अशा अनेक विरोधांचा सामना आम्हाला करावा लागला आहे. कोणतेही स्पष्टीकरण देण्यापेक्षा गावात झालेले परिवर्तन, नागरिकांच्या जीवनमानात झालेली सुधारणा आणि जिल्हाभरात निर्माण झालेले गावाचे नावलौकिक हेच आमचे उत्तर आहे. हे यश काही लोकांना झेपत नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या अफवा पसरवून कामात खोडा घालण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत.”
ते पुढे म्हणाले, “गेल्या काही वर्षांत गावातील रस्ते उंच झाले आहेत. त्यामुळे रस्त्यालगतचा सार्वजनिक परिसर काही ठिकाणी खोल गेला होता. या ठिकाणी समाज सहभागातून ट्रॅक्टर मागवून संरक्षण भिंत व खोलीकरणातून निघालेली जास्तीची माती भरून सार्वजनिक जागा समतल करण्यात आली आहे. हे सर्व काम ग्रामपंचायतीच्या माहितीतून आणि लोकसहभागाच्या माध्यमातूनच झाले आहे.”
मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियानांतर्गत लोकसहभागातून विकासकामे राबविणे अपेक्षित आहे. शासनाची हीच भूमिका लक्षात घेऊन पळसगाव बाई येथे नागरिकांना सोबत घेऊन विकासाचा प्रवास सुरू ठेवण्यात आला आहे. गावातील अडचणी दूर करणे, पूरस्थितीचा धोका कमी करणे आणि भविष्यातील आपत्ती टाळणे यासाठी ही कामे अत्यंत आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
दरम्यान, काही लोकांकडून गेल्या पाच ते सात वर्षांपासून सातत्याने तक्रारी देणे, अर्धवट माहितीवर आधारित बातम्या लावणे आणि गावाची बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशा प्रकारांना कोणतीही किंमत न देता विकासाच्या मार्गावर ठामपणे पुढे जाण्याचा निर्धार ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केला आहे.
गावातील अनेक नागरिकांनीही या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, “आज पळसगाव बाई गावाचा उल्लेख जिल्ह्यात आदर्श ग्राम म्हणून केला जातो. स्वच्छता, रस्ते, जलव्यवस्थापन, समाजोपयोगी उपक्रम यामुळे गावाचा चेहरामोहरा बदलला आहे. हे यश काही लोकांना सहन होत नाही, म्हणूनच विकासकामांवर संशय निर्माण करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
एकूणच, पळसगाव बाई येथे सुरू असलेली संरक्षण भिंत व नदी खोलीकरणाची कामे ही गावाच्या सुरक्षिततेसाठी आणि भविष्यातील संकटे टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. समाज सहभाग, ग्रामपंचायत आणि प्रशासन यांच्या समन्वयातून सुरू असलेली ही कामे थांबवण्याचा कोणताही प्रयत्न ग्रामस्थ स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला न जुमानता, गावाचा विकास, सुरक्षितता आणि समृद्धी हाच ध्यास ठेवून पळसगाव बाई पुढे वाटचाल करत राहील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.