दक्षिण आर्णी वनपरीक्षेत्रात चोरांच्या हाती चाव्या! वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य भोजने यांचा वाळू तस्करांशी ‘अर्थपूर्ण’ घरोबा?

0

🔥दक्षिण आर्णी वनपरीक्षेत्रात चोरांच्या हाती चाव्या! वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य भोजने यांचा वाळू तस्करांशी ‘अर्थपूर्ण’ घरोबा?🔥हाच तो ​राखीव वनातून चक्क ५ किलोमीटरचा रस्ता; आमदाराचे अभय आणि लाचखोरीचा महापूर; सागवान वृक्षांची कत्तल करून निसर्गाचा गळा घोटला!

​यवतमाळ -/ रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा कायद्याचे धिंडवडे निघायला वेळ लागत नाही. असाच काहीसा धक्कादायक प्रकार यवतमाळ उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या दक्षिण आर्णी वनपरीक्षेत्रात उघडकीस आला आहे. या क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) चैतन्य भोजने यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत वाळू तस्करांच्या सोयीसाठी राखीव वनक्षेत्रातून चक्क ५ किलोमीटरचा रस्ता तयार करून दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या बदल्यात कोट्यवधींच्या लाचखोरीची चर्चा असून, एका बड्या लोकप्रतिनिधीने या भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याने वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ​दक्षिण आर्णी वनवर्तुळातील शिवर आणि जलांद्री घाट हे परिसर जैवविविधतेने नटलेले आहेत. मात्र, चैतन्य भोजने यांनी या निसर्गाचे संरक्षण करण्याऐवजी वाळू तस्करांशी हातमिळवणी केली. जलांद्री घाटावरून अवैध वाळू उपसा सुलभ व्हावा, यासाठी भोजने यांनी आपल्या अधिनस्थ क्षेत्रसहाय्यक आणि वनरक्षकांना थेट आदेश देऊन राखीव वनातून नवीन रस्ता तयार करण्यास भाग पाडले. वनविभागाच्या कायद्यानुसार, राखीव वनात एका काट्यालाही धक्का लावणे गुन्हा असताना, येथे चक्क जड वाहनांसाठी ५ किलोमीटरचा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तस्करांसाठी उघडून देण्यात आला आहे.
​​या संपूर्ण प्रकरणामागे किनवटच्या एका आमदाराचा वरदहस्त असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संबंधित आमदाराने “तुम्ही रस्ता करून द्या, कोणताही वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर कारवाई करणार नाही,” असा शब्द भोजने यांना दिल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. या राजकीय अभयामुळेच चैतन्य भोजने यांनी बिनधास्तपणे निसर्गाची लुटालूट सुरू केली आहे. या ‘रस्ते बांधणी’ कामासाठी आणि तस्करांना मोकळे रान देण्यासाठी किती कोटींची लाच घेण्यात आली, याबाबत आता आर्णी तालुक्यात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
​​केवळ रस्ताच तयार केला नाही, तर या रस्त्याच्या आड येणारी अत्यंत मौल्यवान आणि गोलाई असलेली जुनाट सागवान वृक्षे मुळासकट उपटून फेकण्यात आली आहेत. ही मौल्यवान लाकडे जप्त करण्याऐवजी ती पुरावा म्हणून राहू नयेत, यासाठी थेट पैनगंगा नदीच्या पल्याड पोहचविण्याचे ‘कार्य’ही या भ्रष्ट यंत्रणेने पार पाडले आहे. रात्रीच्या अंधारात ओव्हरलोड वाळूचे ट्रक या राखीव वनातून भरधाव वेगाने धावत आहेत, ज्यामुळे वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.
​​पुण्यात बसून सूत्रे हलवणारा जलांद्री घाटाचा कंत्राटदार शुभम गायकवाड हा यवतमाळ जिल्ह्यात आपली पाळेमुळे कशी घट्ट करतो? तहसीलदार वैशाख वाहुरवाघ आणि संबंधित पोलीस यंत्रणेने या अवैध वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वन विभाग, महसूल आणि पोलीस या तिन्ही यंत्रणांचे ‘अर्थपूर्ण’ साटेलोटे असल्याशिवाय इतका मोठा घोटाळा होणे अशक्य असल्याचे बोलले जात आहे.
​​एकीकडे सरकार ‘वृक्ष लागवड’ आणि ‘वन संवर्धन’ यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे चैतन्य भोजने सारखे अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी जंगले विकायला निघाले आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांनी (PCCF) या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
१. राखीव वनात ५ किमीचा रस्ता तयार होईपर्यंत वरिष्ठ अधिकारी झोपले होते का?
२. सागवान वृक्षांची कत्तल करणाऱ्या या ‘लाचखोर’ अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा कधी दाखल होणार?
३. राजकीय दबावापोटी निसर्गाचा हा बळी असाच दिला जाणार का?
​आता चेंडू वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे आहे. जर या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली नाही, तर पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!