सेलू -/तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, सन २०२५–२६ साठीच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यास आज मंगळवारी मंजुरी देण्यात आली. येथील पंचायत समिती सभागृहात आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीत यावेळी लोकाभिमुख निर्णयांचा धडाका पाहायला मिळाला.
या बैठकीत सेलू तालुक्यातील ३६ अतिक्रमणधारकांना महसूल व गावठाण अंतर्गत स्थायी पट्टयांचे वितरण करण्यात आले. हेलोडी, हमदापूर, दहेगांव व बोंडसूला येथील लाभार्थ्यांना या निर्णयाचा थेट फायदा झाला असून, अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांना अधिकृत हक्क मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे.
यावेळी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावनिहाय परिस्थितीचा सखोल आढावा घेताना, पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी, टँकर नियोजन, दुरुस्ती कामे व पर्यायी उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पाणीटंचाईवर वेळेत आणि प्रभावी उपाययोजना राबविणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे आमदार कुणावार यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
या बैठकीस तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे, जिल्हा परिषद वर्धाचे कार्यकारी अभियंता परांडे, सिंदी रेल्वेच्या मुख्याधिकारी पौर्णिमा गावित, गटविकास अधिकारी देवानंद पाणबुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेंडे यांच्यासह सरपंच, विविध विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक व कंत्राटदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामान्य नागरिकांना न्याय देणारे निर्णय आणि लोकहिताला प्राधान्य देणारी प्रशासनाची भूमिका पुढील काळातही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.