यवतमाळ एलसीबीचा ‘जाऊ तिथे खाऊ’ कारभार कोट्यवधींच्या वसुलीमुळे कायदा-सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर!

0

🔥यवतमाळ शहरातील अंत्यत संवेदशिल अप्सरा चौकात खुलेआम जुगार क्लब तसेच भिंगरी सुरू असल्याचे हे बोलके चित्र.🔥हाच तो गुटखा तस्कर आरोपी कुमार ओछाणी.🔥यवतमाळ चे जिल्हा पोलिस अधिक्षक कुमार चिंता.

🔥यवतमाळ एलसीबीचा ‘जाऊ तिथे खाऊ’ कारभार
कोट्यवधींच्या वसुलीमुळे कायदा-सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर!

🔥​‘मिनी एसपी’ शाखेचे प्रमुख सतिष चवरे यांच्या छत्रछायेखाली अवैध धंदे तेजीत.🔥हेच ते मोक्काच्या आरोपीला अटक टाळण्यासाठी एकावीर चौकात १२ लाखांची ‘डील’; पीआय चवरेंची हिरवी झेंडी!

​यवतमाळ -/ जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या आणि पोलीस दलात ‘मिनी एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचा (एलसीबी) कारभार सध्या पूर्णपणे बरबटला असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. एलसीबी प्रमुख सतिष चवरे यांच्या ‘जाऊ तिथे खाऊ’ या वसुली धोरणामुळे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारांचे आणि अवैध धंदेवाल्यांचे राज्य सुरू झाले आहे. महिन्याकाठी मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या वसुलीच्या ‘रसद’मुळे या शाखेने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था थेट धोक्यात आणली आहे. सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी विसरून केवळ खिसे भरण्यात मग्न असलेल्या एलसीबीच्या या भूमिकेमुळे खाकी वर्दीची इभ्रत पार वेशीवर टांगली गेली आहे. ​यवतमाळ शहराचा विचार केला तर आजघडीला शहराच्या मध्यवस्तीत आणि विविध भागात तब्बल ५ ते ७ हायप्रोफाईल जुगार क्लबचे काउंटर खुलेआम सुरू आहेत. या जुगार अड्ड्यांवर रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असताना, स्थानिक गुन्हे शाखा मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसली आहे. केवळ शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही एलसीबीने सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांना जणू ‘अधिकृत परवाना’च देऊन टाकला आहे. मटका, जुगार, बेकायदेशीर दारू विक्री आणि वाळू तस्करी यांसारख्या गुन्ह्यांना एलसीबीचे उघड अभय लाभल्याने ग्रामीण भागातील शांतता आणि सुरक्षितता लयाला गेली आहे. कारवाईचे नाटक करायचे आणि पडद्यामागून वसुलीचा गल्ला जमा करायचा, हाच एककलमी कार्यक्रम सध्या एलसीबी प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जात असल्याचा थेट आरोप होत आहे.
​या संपूर्ण भ्रष्ट कारभाराचा कळस म्हणजे ‘मोक्का’ सारख्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक न करण्यासाठी थेट लाखो रुपयांची दलाली पोलीस कर्मचाऱ्यांनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यवतमाळ सह संपूर्ण विदर्भात गुटखा तस्करीचे मोठे जाळे निर्माण करणाऱ्या टोळीतील मुख्य मोक्काचा आरोपी कुमार ओछाणी याला अटक टाळण्यासाठी एलसीबीच्या एका खास कर्मचाऱ्याने थेट मध्यस्थी केली.
​६ जुलै रोजी यवतमाळच्या गजबजलेल्या एकविरा चौकात गुटखा तस्कर कुमार ओछाणीचा भागीदार प्रकाश गोविदाणी याने आरोपी कुमार ओछाणीला अटक न करण्यासाठी तब्बल १२ लाख रुपयांची ‘डील’ फायनल करण्यात आली. ही रोख रक्कम स्वीकारल्यानंतर, गुन्हेगारांसमोर लोटांगण घालत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष चवरे यांनी आरोपी कुमार ओछाणी याला न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी पडद्यामागून हिरवी झेंडी दाखवली. मोक्कासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस स्वतःहून जामीन मिळवून देण्यासाठी मदत करत असतील, तर जिल्ह्यात कायद्याचे राज्य शिल्लक राहिले आहे का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
​राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात गुटखा तस्करांचा समूळ उच्चाटन करण्यासाठी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. संपूर्ण राज्यात गुटखा माफियांचे धाबे दणाणले असताना, यवतमाळची पोलीस यंत्रणा मात्र अद्यापही या गुटखा तस्करांच्या दावणीला बांधलेली असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. अमरावतीचा मुख्य गुटखा तस्कर जावेद सुपारीवाला आणि अमित कल्याण यांच्या आंतरजिल्हा साखळीत यवतमाळचा कुमार ओछाणी हा प्रमुख मोहरा म्हणून काम करतो. यवतमाळ जिल्ह्यात सध्या विदर्भातील सर्वाधिक बेकायदेशीर गुटख्याची विक्री होत असून, या बदल्यात अमरावतीच्या जावेद सुपारीवालाकडून एलसीबीला दरमहा मोठी आर्थिक रसद पुरवली जात आहे. जर मुख्य आरोपी कुमार ओछाणी याला अटक झाली, तर अमरावतीचा गुटखा सम्राट जावेदही खाकीच्या जाळ्यात अडकेल. हीच भीती असल्याने पोलीस यंत्रणेला हाताशी धरून कुमार ओछाणीला जामीन मिळवून देण्यासाठी एलसीबीचे अधिकारी आणि कर्मचारी आकाशपाताळ एक करत आहेत.
​या संपूर्ण गंभीर आणि खळबळजनक प्रकरणाची माहिती असतानाही, यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) कुमार चिंता यांनी धारण केलेले ‘मौन’ अत्यंत संशयास्पद आणि चक्रावून टाकणारे आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याची भाषा करणाऱ्या एसपी कुमार चिंता यांनी या संवेदनशील विषयावर चकार शब्दही काढलेला नाही. एलसीबी प्रमुखांच्या या मनमानी आणि भ्रष्ट कारभारावर एसपींचे नियंत्रण सुटले आहे की या संपूर्ण प्रकरणात कोणत्या तरी मोठ्या राजकीय बळाचा किंवा मंत्र्यांचा दबाव वापरला जात आहे, अशी तीव्र शंका आता यवतमाळच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात जाहीरपणे व्यक्त केली जात आहे.
​’मिनी एसपी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचा धाक गुन्हेगारांवर असणे अपेक्षित होते. मात्र, एलसीबीच्या सद्यस्थितीतील ‘जाऊ तिथे खाऊ’ आणि पैशांच्या मागे धावण्याच्या वृत्तीमुळे गुन्हेगारांचे मनोबल गगनाला भिडले आहे. मोक्काचे आरोपी शहरात मोकाट फिरत आहेत, तस्कर पोलिसांसोबत चौकाचौकात लाखांच्या डील्स करत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील या खाकीच्या लाजीरवाण्या कारभाराची गृहविभागाने तात्काळ दखल घेऊन एलसीबी प्रमुख सतिष चवरे यांच्यासह संपूर्ण वसुली टोळीची चौकशी करावी, अन्यथा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याशिवाय राहणार नाही, हे स्पष्ट आहे.(क्रमशः)

         ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!