३० कोटींच्या विकास निधीवरून यवतमाळ नगरपरिषदेत आरोप-प्रत्यारोप

0

🔥३० कोटींच्या विकास निधीवरून यवतमाळ नगरपरिषदेत आरोप-प्रत्यारोप

🔥निधी मंजुरीचे पत्र, प्रशासकीय मान्यता वा शासन आदेश कुठे? संतोष बोरेले यांचा सवाल; नियोजन न झाल्यास उपोषणाचा इशारा

यवतमाळ प्रतिनिधी -/ यवतमाळ शहराच्या विकासासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या दाव्यावरून नगरपरिषदेत पुन्हा राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या निधीबाबत अद्याप शासनाकडून पत्र, प्रशासकीय मान्यता, निधी मंजुरी अथवा शासन आदेश प्राप्त झालेला नसल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा नगरसेवक संतोष बोरेले यांनी केला आहे. त्यामुळे केवळ घोषणांवर विकासाचा गाजावाजा न करता प्रत्यक्ष कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

बोरेले यांनी ३ ऑक्टोबर २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रातून शहरातील विकासकामांच्या नियोजनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. यापूर्वी २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या लेखी नियोजन पत्रावर कार्यवाही न झाल्यास ११ ऑक्टोबर रोजी दुर्गामातेच्या स्थापना दिवशी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला असल्याचे पत्रात नमूद आहे.

पत्रानुसार, सत्तापक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली असून, त्यानुसार ३० कोटी रुपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, या निधीबाबत शासनाचे पत्र, प्रशासकीय मान्यता, निधी मंजुरी अथवा शासन आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिल्याचे बोरेले यांनी म्हटले आहे.

“किती खोटे बोलायचे, रेटून बोलायचे?” असा सवाल उपस्थित करत संतोष बोरेले यांनी शहरातील नागरिकांची दिशाभूल होऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. मागील काही महिन्यांत प्रशासनाने नागरिकांकडून कर वसूल केला असला, तरी शहरातील प्राथमिक सुविधांचा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

शहरातील स्वच्छता, सफाई, रस्त्यांची डागडुजी, नाल्यांची समस्या तसेच नवरात्रोत्सवासाठी आवश्यक कामे याबाबत वारंवार निवेदने, पत्रव्यवहार आणि मागण्या करण्यात आल्या. मात्र, अपेक्षित कार्यवाही झालेली नसल्याचा आरोपही पत्रातून करण्यात आला आहे.

‘सुवर्ण योग’चा विकासकामांसाठी उपयोग कुठे?

यवतमाळ नगरपरिषदेला मोठ्या प्रमाणात विकासकामांसाठी निधी मिळण्याची संधी असल्याचे सांगत बोरेले यांनी ‘सुवर्ण योग’चा खेळखंडोबा होऊ देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. शहरातील नागरिकांना प्राथमिक सुविधा मिळणे आवश्यक असून विकासाच्या नावावर केवळ श्रेय घेण्याचे राजकारण होऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ३० कोटींच्या निधीबाबत प्रत्यक्ष मंजुरी व शासन आदेश उपलब्ध आहेत का? तसेच त्यातून कोणती कामे प्रस्तावित आहेत, याबाबत नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी बोरेले यांनी केली आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!