🔥मंत्री नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या जिवंत कोंबड्या
🔥दारव्ह्यात ठाकरे सेनेचे आक्रमक आंदोलन
यवतमाळ-/ यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलन केले. दारव्हा तालुक्यातील मानकिनी येथे मंत्री राणे यांच्या ताफ्यावर थेट जिवंत कोंबड्या भिरकावून ठाकरे सेनेने जोरदार निदर्शने केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली असून परिसरात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंत्री नितेश राणे हे दारव्हा तालुक्यातील मानकिनी येथील तलावाची पाहणी करण्यासाठी आणि स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी आले होते. त्यांचा ताफा मानकिनी परिसराच्या दिशेने जात असतानाच, ठाकरे सेनेचे दारव्हा तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसले होते. ताफा जवळ येताच कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पुढे येत मंत्र्यांच्या वाहनांची वाट अडवण्याचा प्रयत्न केला. आंदोलक केवळ ताफ्यासमोर आले नाहीत, तर त्यांनी हातातील जिवंत कोंबड्या थेट मंत्र्यांच्या वाहनांच्या दिशेने फेकल्या. अचानक गाडीच्या काचांवर आणि समोर कोंबड्या आदळल्याने चालकाने तातडीने वाहनांचा वेग कमी केला. कार्यकर्त्यांनी हातात कोंबड्या उंचावून ‘कोंबडी चोर, मुरगी चोर’ अशा गगनभेदी घोषणा दिल्या. या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. राणे यांच्या भूतकाळातील वादग्रस्त वक्तव्यांचा आणि राजकीय भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाकरे सेनेने ही पद्धत वापरल्याचे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या भिरकावल्याचे पाहताच बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस पथकाची एकच तारांबळ उडाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी रवी तरटे यांच्यासह उपस्थित ठाकरे सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. कार्यकर्त्यांना बाजूला केल्यानंतर मंत्र्यांचा ताफा सुरक्षितपणे पुढील नियोजित स्थळाकडे रवाना करण्यात आला. नितेश राणे आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर असो वा जाहीर सभांमध्ये, दोन्ही बाजूंकडून नेहमीच एकमेकांवर बोचरी टीका केली जाते. मात्र, अशा प्रकारे थेट मंत्र्यांच्या ताफ्यावर कोंबड्या फेकून आंदोलन केल्यामुळे विदर्भातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. सुरक्षेतील त्रुटींवरून सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात असताना, जनतेचा संताप या आंदोलनातून व्यक्त झाल्याचा दावा ठाकरे सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या घटनेनंतर दारव्हा आणि यवतमाळ परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.