मस्के जेल्वर्स मध्ये विकत घेतला जातो चोरचीच्या सोन्या चांदीचे दागिने 

0

🔥मस्के जेल्वर्स मध्ये विकत घेतला जातो चोरचीच्या सोन्या चांदीचे दागिने 

🔥महिला टोळीच्या चोरीच्या मालाचा यवतमाळात सौदा? रुग्णालय परिसरातील पाव तोळ्याच्या व्यवहारापासून संशयास्पद साखळीची चर्चा

यवतमाळ,प्रतिनिधी -/ यवतमाळ शहरात सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीच्या घटनांमागे केवळ चोरी करणाऱ्या टोळ्याच नव्हे, तर चोरीचा माल खरेदी करून तो वितळविणाऱ्या आणि पुढे सराफा बाजारात फिरविणाऱ्या व्यक्तींचे जाळे कार्यरत असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या प्रकरणात ‘ प्रभु मस्के’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका सोनाराच्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. काही महिन्यांपूर्वी वसंतराव शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सुमारे पाव तोळे सोन्याच्या व्यवहाराची चर्चा झाली होती. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर चोरीचे सोने नेमके कुठे विकले जाते, कोण खरेदी करते आणि पुढे ते कुठे वितळवून बाजारात आणले जाते, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळातील काही महिला चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचा संशय असून, या महिलांच्या कुटुंबातील काही पुरुष व्यक्तींचे संबंधित सोनाराशी संपर्क असल्याचा आरोप आहे. चोरीचे सोने थेट महिला न विकता त्यांचे पती अथवा भाऊ संबंधित व्यक्तीकडे घेऊन जात असल्याची माहिती समोर येत आहे. व्यवहारानंतर काही दिवसांनी पैसे देण्यात येतात आणि चोरीचे सोने वितळवून त्याचा माग काढणे कठीण केले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित टोळी यवतमाळ शहराऐवजी कानपूर, भोपाळ, ग्वाल्हेर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये चोरी करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करून चोरीचा माल यवतमाळात आणला जातो का, याची तपास यंत्रणांनी पडताळणी करण्याची गरज आहे. दारव्हा रोड परिसरातील एका वस्तीमध्ये संबंधित व्यक्तींची ये-जा असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तेथे चोरीच्या सोन्याचे व्यवहार होतात का, याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. चोरीचा माल असल्याची माहिती असूनही तो कमी दरात खरेदी केला जातो आणि नंतर वितळवून त्याची ओळख बदलली जाते, असा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात येत आहे. चोरीचे सोने वितळविल्यानंतर ते यवतमाळच्या सराफा बाजारातील इतर व्यापाऱ्यांकडे पोहोचते का, याचीही आर्थिक व्यवहारांसह चौकशी होणे गरजेचे आहे. दरम्यान, संबंधित सोनाराच्या आर्थिक स्थितीत झालेली कथित वाढ, आलिशान घर, महागड्या वाहनांचा वापर आणि सोन्याच्या व्यवहारातील वाढ यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मात्र या सर्व बाबींची अधिकृत कागदपत्रे आणि तपास यंत्रणांकडून पुष्टी होणे आवश्यक आहे. संबंधित सोनाराचा मुलगाही आता या व्यवसायात सक्रिय झाल्याचा आरोप करण्यात येत असून, घरातूनच सोन्याचे व्यवहार केले जात असल्याची चर्चा आहे. हा व्यवसाय अधिकृत परवाने, खरेदीची बिले, ग्राहकांची नोंद, KYC आणि वितळविलेल्या सोन्याच्या स्रोताच्या नोंदींसह चालतो का, याची तपासणी करण्याची गरज आहे. जर चोरीचे सोने खरेदी-विक्रीचे जाळे प्रत्यक्षात कार्यरत असेल, तर केवळ चोरी करणाऱ्या महिलांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. चोरीचा माल स्वीकारणारे, त्याची किंमत ठरविणारे, वितळविणारे आणि पुढे बाजारात पाठविणारे घटक शोधणे तितकेच महत्त्वाचे आहे. यवतमाळ पोलिसांनी संबंधित सोनाराचे मागील काही वर्षांतील सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, संशयास्पद ग्राहक, वितळविलेल्या सोन्याची नोंद, बँक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित महिला व त्यांच्या नातेवाईकांशी असलेले संपर्क तपासावेत, अशी मागणी होत आहे.

चोरी कुठे होते यापेक्षा चोरीचा माल कुठे खपतो, हा तपासाचा मुख्य मुद्दा ठरला पाहिजे. या कथित साखळीच्या मुळाशी जाऊन तपास झाला, तर राज्याबाहेरील चोरीच्या घटनांचा यवतमाळातील सोन्याच्या बाजाराशी काही संबंध आहे का, हेही स्पष्ट होऊ शकते.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!