मुडाण्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; थेट तीन खाटांचे रुग्णालय थाटून ॲलोपॅथीचे उपचार,तालुका आरोग्य पथकाचा छापा 

0

🔥मुडाण्यात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; थेट तीन खाटांचे रुग्णालय थाटून ॲलोपॅथीचे उपचार,तालुका आरोग्य पथकाचा छापा 

🔥उच्च क्षमतेच्या प्रतिजैविकांसह वैद्यकीय साहित्याचा साठा जप्त; महागाव पोलिसांत गुन्हा दाखल

​यवतमाळ -/ कोणतीही वैद्यकीय पदवी अथवा शासनाचा अधिकृत परवाना नसताना थेट गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून आणि तीन खाटांचा ‘आंतररुग्ण विभाग’ (आयपीडी) थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या एका भोंदू डॉक्टरचा महागाव तालुका आरोग्य पथकाने पर्दाफाश केला. तालुक्यातील मुडाणा येथे सोमवारी सायंकाळी ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आरोपी उज्वल जगदीश ठाकूर (वय ४३, रा. मुडाणा) याच्याविरुद्ध महागाव पोलीस ठाण्यात ‘वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, १९६१’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुडाणा येथे एक व्यक्ती कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना स्वतःला डॉक्टर भासवून सर्रास ॲलोपॅथी उपचार करत असल्याची लेखी तक्रार नागरिकांनी आरोग्य विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत तालुकास्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीचे सदस्य सचिव तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसेनजीत मिलिंद धुळधुळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सोमवारी दुपारी ४:३० ते ५:३० वाजण्याच्या सुमारास उज्वल ठाकूर याच्या निवासस्थानी अचानक छापा टाकला. पथकात आरोग्य सहायक गोपाल ठाकरे, डॉ. निळकंठ जाधव, आरोग्य सेवक ज्योतिबा जळकुटे आणि कार्यक्रम सहायक प्रभाकर मोरे यांचा समावेश होता. आरोग्य पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आरोपी उज्वल ठाकूर गळ्यात स्टेथोस्कोप घालून रुग्णांची तपासणी करताना रंगेहाथ मिळून आला. तपासणीदरम्यान धक्कादायक वास्तव समोर आले. आरोपीने घराच्या दोन खोल्यांमध्ये चक्क एका सुसज्ज क्लिनिकसारखा पसारा मांडला होता. पहिल्या खोलीत बाह्यरुग्ण तपासणी सुरू होती, जिथे एका रुग्णाला सलाईन लावलेली आढळली. तर लगतच्या दुसऱ्या खोलीत रुग्णालयाप्रमाणे तीन खाटा (बेड्स) टाकून आंतररुग्ण विभाग चालवला जात असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने वैद्यकीय पदवी, नोंदणी अथवा व्यवसाय परवान्याबाबत विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही कायदेशीर पुरावा अथवा पात्रता नसल्याचे स्पष्ट झाले. 

घटनास्थळावरून गंभीर आजारांवर केवळ तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिली जाणारी ॲलोपॅथीची औषधे व इंजेक्शन्स जप्त करण्यात आली. यामध्ये​‘डॉ. यु. के. ठाकूर एन.डी. संभाजी नगर, मंगल क्लिनिक’ अशा नावाच्या रुग्ण तपासणी पावत्यासेफ्ट्रियाक्सोन,पायपेरासिलिन-टॅझोबॅक्टम, अमिकासिन सल्फेट यांसारखी उच्च क्षमतेची प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स)

​क्लोरोक्विन फॉस्फेट, बीटामायथासोन (स्टिरॉइड), पॅन्टोप्राझोल, डायक्लोफेनाक सोडिअम इंजेक्शन्स ​लिडोकेन स्प्रे (स्थानिक भूल देणारे औषध) आणि टाके घालण्यासाठी वापरले जाणारे स्टेराइल स्किन स्टेपलर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसेनजीत धुळधुळे यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलिसांनी आरोपी उज्वल ठाकूर याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम, १९६१ चे कलम ३३(१) आणि ३३(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. ठाणे प्रभारी अधिकारी सेवानंद वामने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पांडुरंग मुरकुटे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांनी अशा भोंदू व अनधिकृत डॉक्टरांकडे उपचार न घेता शासकीय अथवा अधिकृत तज्ज्ञ डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!