आर्णीत रेती तस्करांचा धुमाकूळ; महसूल विभागाच्या आशीर्वादाने ‘राणी धानोरा’ परिसरात अवैध उपसा जोमात!..

0

🔥हाच तो रेती माफिया गौरव डांगे आर्णी तालुक्यातील राणी धानोरा येथील अवैध रेतीची तस्करी करणारा.🔥हेच ते तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्या आशीर्वादाने ‘राणी धानोरा’ परिसरात अवैध उपसा जोमात सुरू.​🔥हाच तो अरुण वांजाळ मंडळ अधिकारी,आणि अवैध रेतीची तस्करी करणारा गौरव डांगे या दोघांची ‘मिलीभगत’ आणि अधिकाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण’ मौन; छुप्या कॅमेऱ्यासमोर तस्कराचा खळबळजनक खुलासा आता समोर.

यवतमाळ -/ आर्णी तालुक्यातील राणी धानोरा परिसरात सध्या अवैध रेती उत्खननाचा महापूर आला असून, महसूल विभागाचे नियम धाब्यावर बसवून दिवसाढवळ्या निसर्गाची लूट सुरू आहे. विशेष म्हणजे, स्थानिक मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या नाकाखाली हा सर्व प्रकार सुरू असून, ‘लेण-देण’ करून हा गोरखधंदा फोफावला असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.मंडळ अधिकारी अरुण वांजाळ आणि रेती तस्कर गौरव डांगे या दोघांनी संगनमत करून राणी धानोरा परिसरातून रेतीचा अवैध साठा आणि विक्रीचा जणू कारखानाच उघडला आहे.
​​मिळालेल्या माहितीनुसार, रेती तस्कर गौरव डांगे याने आपल्या स्वतःच्या शेतातून रेतीचा अनधिकृत घाट तयार केला आहे. या ठिकाणाहून दररोज १० ते १५ ट्रॅक्टरच्या साहाय्याने अहोरात्र रेतीचा उपसा केला जातो. केवळ ट्रॅक्टरच नव्हे, तर ३ ते ४ हायवा टिप्पर या परिसरातून रेतीची अवैध वाहतूक करताना सर्रास दिसून येतात. शासनाचा कोणताही महसूल न भरता, पर्यावरणाचे नियम पायदळी तुडवून या परिसरातून रेती ओरबडली जात आहे. ​‘दैनिक सहासिक’च्या प्रतिनिधींनी जेव्हा या परिसरात स्टिंग ऑपरेशन केले, तेव्हा रेती तस्कर ‘गोल्या’ याने छुप्या कॅमेऱ्यासमोर सर्व धक्कादायक माहिती उघड केली. गोल्याने दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व खेळ केवळ स्थानिक स्तरावर मर्यादित नसून, याचे धागेदोरे थेट तहसील कार्यालयापर्यंत पोहोचले आहेत.
​”तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांना नियमित रसद पुरवली जाते. प्रत्येकाचा रेट ठरलेला आहे, त्यामुळे कुणीही आमच्या वाटेला जात नाही,” असा खळबळजनक दावा तस्कर गोल्याने कॅमेऱ्यासमोर केला आहे. या दाव्यामुळे महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकारी आता यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंडळ अधिकारी ​अरुण वांजाळ हा स्वतःच्या गावात गौरव डांगे याच्या टिप्परने रेती आणून खाली करतो. त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने या रेतीची किरकोळ आणि घाऊक विक्री केली जाते. गौरव डांगे याने स्वतःच्या चार ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेती उत्खनन करून गावाबाहेर मोठे साठे (स्टॉक) लावले आहेत. तिथून चार ते पाच टिप्परच्या माध्यमातून संपूर्ण आर्णी तालुक्यात रेती पुरवली जाते. या अवैध व्यवसायातून या दोघांनी आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी मोठी माया जमवल्याची चर्चा परिसरात रंगत आहे.
​​एकीकडे सरकार गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून ‘घरकुल योजना’ राबवत आहे. मात्र, आर्णी तालुक्यात या अवैध उपशामुळे घरकुलधारकांना साध्या एका ट्रॅक्टर रेतीसाठी वनवण फिरावे लागत आहे. गरिबांना रेती उपलब्ध होत नाही, मात्र बड्या कंत्राटदारांना आणि बिल्डरांना मंडळ अधिकारी अरूण वांजाळ आणि रेती तस्कर गौरव डांगे यांच्या माध्यमातून हवा तितका रेतीचा पुरवठा केला जात आहे. महसूल विभागाच्या या दुजाभावामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
​​मंडळ अधिकारी आणि पटवारी यांना या सर्व प्रकाराची पूर्ण कल्पना असतानाही ते कारवाई का करत नाहीत? राणी धानोरा परिसरातून दररोज निघणारे ट्रॅक्टर आणि टिप्पर अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? की ‘ठरलेला रेट’ मिळाल्यामुळे हे अधिकारी डोळेझाक करत आहेत? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आर्णी तालुक्यातील या रेती तस्करीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच लगाम न घातल्यास, पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याची भीती आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अरुण वांजाळ, गौरव डांगे आणि त्यांना साथ देणाऱ्या भ्रष्ट महसूल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 आर्णी,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!