इशांत मिनरल्सचा ‘खनिज’ डल्ला: कोट्यवधींच्या महसुलाला चुना लावत अडेगावात माफियाराज!

0

🔥इशांत मिनरल्सचा ‘खनिज’ डल्ला: कोट्यवधींच्या महसुलाला चुना लावत अडेगावात माफियाराज!

यवतमाळ -/ एकीकडे ‘शेतकरी हिता’च्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे पर्यावरणाचा घास घेणाऱ्या भांडवलदारांचे पाय धुवायचे, असा दुटप्पी खेळ झरी जामणी तालुक्यातील अडेगाव परिसरात सुरू आहे. ‘इशांत मिनरल्स’ या खाण कंपनीने शासनाच्या डोळ्यात धूळ फेकत कोट्यवधी रुपयांची अवैध उलाढाल मांडली असून, स्थानिकांना धमकावण्यासाठी चक्क ‘गुंड’ पोसल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
​सत्ताधारी नेत्यांच्या आशिर्वादाने खनिजाची लूट
​मिळालेल्या माहितीनुसार, इशांत मिनरल्स ही कंपनी कागदोपत्री पवन कुमार शर्मा यांच्या नावावर असली तरी, याचे सर्व सूत्रे नागपूरचा ‘अरिहंत अग्रवाल’ हलवत आहे. विशेष म्हणजे, स्वतःला शेतकऱ्यांचा कैवारी म्हणवणारे माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरवार यांनीच अग्रवालला या मौल्यवान खनिज संपत्तीच्या उत्खननाचा जणू ‘ठेका’च दिला असल्याची चर्चा परिसरात आहे. या राजकीय वरदहस्तामुळेच जिल्हा खनिकर्म विभाग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या गंभीर प्रकरणाकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप होत आहे. ​अडेगाव आणि चिलई परिसरातील जमिनीचा पोत इशांत मिनरल्सने पूर्णपणे खराब केला आहे. शासनाने बंदी घातलेली असतानाही, महागड्या डोलोमाईटसाठी येथे हाय-डेन्सिटी स्फोटकांचा सर्रास वापर केला जात आहे. या ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे जात असून शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
​या बेकायदेशीर कृत्यांना विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी वणीतील ‘जॉनी’ नावाच्या एका व्यक्तीला अग्रवालने पाळले आहे. हा इसम ‘मालका’चा निष्ठावंत होऊन सामान्य जनतेला धमकावत असून, अधिकाऱ्यांवरही दबाव तंत्राचा वापर करत असल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. ​इशांत मिनरल्समधून काढलेला चुनखडीचा दगड छुप्या मार्गाने वणीतील राजुरा (कॉ.) येथील अवैध चुनाभट्ट्यांवर पाठवला जातो. तिथून हा चुना साखर कारखान्यांना पुरवला जातो. या संपूर्ण साखळीत दररोज कोट्यवधींची काळी कमाई केली जात आहे. ETS मोजणी आणि पर्यावरणीय परवान्यातील (EC) अटींना केराची टोपली दाखवत, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त उत्खनन करून निसर्गाचा आणि सरकारी तिजोरीचा गळा घोटला जात आहे.
​​परप्रांतीय माफियांच्या या दादागिरीला चाप लावण्यासाठी आता अडेगाव, खडकी आणि गणेशपूर येथील शेतकरी व तरुण वर्ग आक्रमक झाला आहे. या ‘लुटारू’ खाण मालकांना हाकलून लावण्यासाठी मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाली असून, लवकरच आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
​दुसरीकडे, ‘साहसिक’चे रवींद्र कोंटबकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शासनाची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी ते लवकरच नागपूर खनिकर्म विभाग आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत.यामध्ये अवैध रित्या कोट्यावधी रूपयाची शासनाचे नुकसान करून आपले घर भरणार्या विरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहे. ​प्रशासनाला इशारा जर वेळेत या खाणीवर कारवाई करून ती बंद करण्यात आली नाही, तर होणाऱ्या जनक्षोभाला सर्वस्वी प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार राहतील, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.(क्रमशः)

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 यवतमाळ-वर्धा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!