साहुर शरद वरकड -/ आष्टी तालुक्यात एकीकडे दुष्काळाचे सावट, दुसरीकडे वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान आणि त्यात वाघाच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांसमोर शेतीचे संरक्षण करण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या गंभीर प्रश्नांकडे वनविभागाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी धाडी, साहूर, बोरगाव, द्रुगवाडा व माणिकवाडा परिसरातील शेतकऱ्यांनी आज वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
निवेदनात वन्यप्राण्यांमुळे पिकांचे होणारे नुकसान, त्याबाबत वनविभागाकडे नोंदविल्या जाणाऱ्या प्रकरणांबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करावेत, तसेच प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर फळबागांमध्ये पक्ष्यांमुळे होणाऱ्या मोसंबी पिकाच्या नुकसानीचीही भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
वाघाच्या भीतीमुळे शेतकरी आपल्या शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धजावत नाहीत. त्यामुळे वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या सर्व समस्या वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे यांनी गांभीर्याने ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी “वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे कोणतेही प्रकरण वनविभागाकडून थांबविण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा वनविभागाकडे अर्ज करावा. त्यानंतर तातडीने पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठवून नियमानुसार नुकसानभरपाई मिळवून देण्याची कार्यवाही करण्यात येईल,” असे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या निवेदनातील मागण्यांव्यतिरिक्त परिसरातील इतर अडचणींचीही त्यांनी माहिती घेतली. वन्यप्राण्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वाघाच्या हालचाली आढळल्यास नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करताना वाघाचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी त्याच्या जवळ जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
“वाघाची किंवा इतर वन्यप्राण्यांची हालचाल कुठे आढळून आल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी. स्वतःचा जीव धोक्यात घालून वन्यप्राण्यांच्या जवळ जाणे टाळावे,” असेही त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
दरम्यान, आष्टी तालुक्यात शेतकऱ्यांसमोर संकटांची मालिका कायम असून एका बाजूला दुष्काळाचे सावट, दुसऱ्या बाजूला वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान आणि वाघाच्या दहशतीमुळे शेतीचे संरक्षण करण्याची अडचण निर्माण झाली आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली आहे. तालुक्यात शेतकरी आत्महत्यांसारख्या गंभीर घटना घडत असताना शासनाने शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे केवळ कागदोपत्री न पाहता तातडीने ठोस उपाययोजना करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
निवेदन देतेवेळी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अंकित कावळे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश राऊत, गजानन गायकवाड, मंगेश लांडे, सचिन भिसे, किरण वानखेडे, राहुल गावंडे, प्रदीप तळकित, नरेश चौधरी, निखिल गावंडे, राहुल गुढधे, गौरव गावंडे यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.