हिंगणा -/आज रविवार… त्यातच गजानन महाराज प्रकट दिनाचा बहाणा!
हिंगणा तालुक्यातील अनेक महसूल अधिकारी-कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याचा फायदा घेत आज सकाळपासून मुरुम, गिट्टी व चूरीचे ट्रक मोठ्या प्रमाणात धावू लागले आहेत.
या वाहतुकीला रॉयल्टी आहे की नाही, ओव्हरलोड आहे की नाही — हे तपासणार कोण? असा थेट प्रश्न उपस्थित झाला आहे.
ट्रकवरील मुरुम-गिट्टी रस्त्यावर सांडत असल्याने रस्ते अक्षरशः घसरडे झाले आहेत. परिणामी दुचाकी वाहन घसरून पडणे, गंभीर दुखापती आणि मोठे अपघात घडत आहेत. तरीही याकडे कोणाचेच लक्ष नाही, हीच धक्कादायक बाब आहे.
अधिकाऱ्यांकडूनच “आज रविवार आहे, गजानन महाराज प्रकट दिन आहे, कोणी राहणार नाही” अशी माहिती पसरवली जात असल्याची चर्चा आहे. मग प्रश्न असा की —
हेच ट्रक तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन, पंचायत समिती व वनविभागाच्या कार्यालयांसमोरून जात असताना जबाबदार यंत्रणांना ते कसे दिसत नाहीत?
की दिसूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे?
जर उद्या एखादा प्राणघातक अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
रविवार-सुट्टीचा गैरफायदा घेऊन सुरू असलेली ही बेकायदेशीर, धोकादायक वाहतूक तात्काळ थांबवली नाही, तर जनतेत तीव्र संताप उसळल्याशिवाय राहणार नाही.
प्रशासन जागे होणार का, की अपघातानंतरच हालचाल होणार?(क्रमशः)